बकऱ्याची बॉडी!

नमस्कार,

कथासंग्रह वाचण्याची मजा काही औरच असते. त्यात मराठीतले वाचायला तर अजूनच मजा येते. कथासंग्रह लिहिणाऱ्या लेखकाचे त्याच्या प्रत्येक कथेभोवती एक विश्व असते. ते धुंडाळायला मजा येते. पण ही मजा बऱ्याचदा अस्वस्थदेखील करून जाऊ शकते. असाच अनुभव समर खडसने लिहिलेल्या ‘बकऱ्याची बॉडी’ नामक पुस्तकातून येतो. ज्यांना कुणाला असे वाटते कि आपण एका बैठकीत पुस्तक वाचून काढू शकतो त्यांच्यासाठी हे पुस्तक आव्हान आहे. प्रत्येक कथेत एक दाहक अनुभव मिळत जातो. शिवाय फार वाचन नसेल तर त्या अनुषंगाने येणारे संदर्भदेखील लवकर लागणार नाहीत. डाव्या चळवळीतली बरीच नावे अधूनमधून येत राहतात. माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याने त्यातली बरीचशी नावे रशियन व्होडक्यासारखी वाटत राहतात. कोकणी मुसलमानी बोली सापडते, जी कोकणात गेल्याशिवाय सहसा आपल्या कानावर पडत नाही. मटणाचा तुकडा कसा न शिजवता चावला आणि खायचा प्रयत्न गेला कि पचणे सोडा चावणे पण मुश्कील होते. रबरासारखा लागतो. मग कळते कि हा शिजवून खाल्ला तरच खाऊ शकतो. तसेच या कथा एका बैठकीत न वाचता निवांतपणे “रीडिंग बिटवीन द लाईन्स” करत वाचल्या “तरच” कळू शकतील या पठडीतल्या आहेत.

पहिली कथा आहे ती “बकऱ्याची बॉडी.” या एकाच कथेत मुस्लीम वस्ती आणि त्यात चालणाऱ्या गोष्टी यांचे बऱ्यापैकी विवेचन आपणास होते. सुन्नी, शिया असणे किंवा मग सुन्नी असल्यास साफी कि हन्नफी, त्यातही मग देवबंद, तब्लीग, एह्ले हदीस या नावांची उजळणी सुरु होते. कोकणी मुसलमानाला त्रास दिला जातो हे सुरुवातीलाच समर सांगतो. “खेकडे में खून नही और कोकनी में इमान नही” हे वाक्य आपण वाचतो. उत्तर भारतीय मुसलमानांच्या नादाला लागून पोरे वाया जातील म्हणून कथेतला बाबा कुर्ल्याच्या गरीब नवाज इलाक्यात मिळणारे स्वस्त घर घेत नाही. मुलांनी शिकूनसवरून कामाधंद्याला लागावे अशी त्याची अपेक्षा. हे कुटुंब आहे कोकणातले आणि कहाणी आहे नसीम कुलकर्णीची. त्याच्यावर झालेल्या पोलीस अत्याचाराची. पोलिसांची मुस्लीम लोकांबरोबर असलेली वागणूक किंवा मुस्लीम लोकांना पोलिसांकडून सतत “टार्गेट” केले गेल्याचा असलेला राग या कथेतून सतत व्यक्त होतो. नसीमशी बोलताना जाधव नावाचा पोलीस म्हणतो,”काय रे आयझवाड्या, तुझ्या गांडीला दात आले काय! गद्दार, साल्यांनो सत्तेचाळीसलाच तुमच्या गांडीवर लाथ घालून हाकलायला हवं होतं, भ्यान्चोद इथलं खाता आणि आमच्या तोंडात हागता काय रे.” तर “काही सांगता येत नाही. साले मादरचोद हल्ली आपल्या कौममधला कुणीही जरासुद्धा शिकून-सवरून पुढे जायला लागला कि यांची गांड जळायला लागते. साले इनके तो माके लौडे.” असे म्हणणारा मुराद. नसीम कुलकर्णी दुबईला जाऊन आलाय आणि पोलिसांनी त्याला अतिरेक्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अटक केलीय. त्याला मारहाण करून त्याच्याकडून माहिती काढायचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांचा आरोप आहे कि तो ज्याच्या रूमवर राहायचा त्या रूमवर सिमीचे लोक राहायचे. नसीमला मुअज्जम भेटतो. तो डॉक्टर आहे. त्याचा पेशंट आयएसआयचा एजंट होता म्हणून त्याला धरलाय. तो म्हणतो,”त्याचे धंदे काय होते मला माहित नाही. माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक हिंदू माणसाच्या धंद्यावर मी लक्ष ठेवतो काय, ते मग मुसलमानाच्या धंद्यावर का ठेवावं?” नसीमला फटकावूनसुद्धा तो काही बोलत नाही. मुअज्जम नसीमला बोलतो, “मी मेडिकलच्या इंटर्नशिपला असताना सगळे मला म्हणायचे, यार तू डॉक्टर झालास तरी जुम्माची नमाज सोडत नाहीस. साला आमच्या होस्टेलच्या प्रत्येक खोलीत गणपती आणि सततचा फोटो लावून ठेवलेला होता. प्रत्येक परीक्षेच्या आधी हे भडवे त्याची पूजा करायचे. पण तरीही ते प्रोग्रेसिव्ह, देशभक्त आणि आम्ही दाढी वाढवलेले धर्मांध.” पुढे तो म्हणतो,”पाकिस्तान झाल्यावर आपले बापजादे या देशात का थांबले हेच समजत नाही.” मुअज्जम वैतागलाय. दुबईला जाऊन आलेला नसीम बोलतो.”पाकिस्तानात तर अजून वाईट स्थिती आहे. तिथे पंजाब्यांची दादागिरी आहे. शिवाय हि देश, ही माती आपल्या बापजाद्यांची आहे.” मुअज्जम म्हणतो,”तुझं आणि माझं दोघांचंही करिअर संपल्यात जमा आहे. टेररिस्टचा स्टँप म्हणजे काय ते तुला समजतंय. तुझ्या सगळ्या आयुष्याला बूच. मी तर सगळ्या आशा सोडून दिल्यात. इथून २-३ वर्षांनी जेव्हा बाहेर पडेन, तेव्हा देवबंदच्या दारूल उलुममध्ये जाऊन दिनची तालीम घ्यायचा माझा विचार आहे. या देशातल्या सगळ्यांनाच आपली लायकी फक्त मौलाना व्हायची आहे असं वाटत असेल तर आपल्यापुढे तरी काय इलाज आहे?” हे सगळे वाचताना आपण भिरभिरून जातो. नसीम काही बोलत नाही म्हणून त्याचा अपरिमित छळ होतो आणि तो मरतो. त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यात येते. पोलीस नेहमीप्रमाणे “गेम” खेळतात. हा गेम खेळणारे असतात माने, जाधव आणि खान नावाचे पोलीस. शिवाय वरचा “कुणीतरी” साहेब.

दुसरी कथा आहे ती शरफूवर. तोदेखील कोकणी मुसलमान. पोरगा होत नाही म्हणून उदास. एक महत्वाचे म्हणजे या कथेतून कोकणी मुसलमानांची बोली भाषा उमजत जाते. काही नवीन शब्द ऐकायला मिळतात. शरफू दुसरे लग्न करतो. अर्थात पहिल्या बायकोची मान्यता आहे “गृहित” धरून. आपल्याला मूल होत नाही याचा त्याच्यातल्या “पुरुषाला” प्रचंड त्रास होतोय. त्याची पहिली बायको पहिल्यांदा मूल न होण्याने आणि आता नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने अस्वस्थ आहे. ती घर सोडून जाते. मूल व्हावे म्हणून शरफूने दुसरी बायको केलेली. पण तरीही मूल होत नाही म्हटल्यावर शरफू तिसरा निकाह करतो. पुरुषाची कधी चूकच नसते, आई न होणे ह्यात फक्त बाईचाच दोष असतो आणि शरफू त्याच मानसिकतेचा असतो. तिसऱ्या लग्नानंतर तो लगेच बाप होणार या खुशीत गावजेवण घालतो. पण खरे काय ते दुसऱ्या बायकोला, आयेशा माहीत असते. ऐन कार्यक्रमाच्या वेळी येऊन ती शरफूवर चढते. “अरे तू बाप्योच नायस तर तुझी बायको पोटाशी ऱ्हेलूच कशी?” तिचा सगळा राग बाहेर येतो. तुझ्या पहिल्या बायकोवर मी अन्याय केला म्हणून माझा हिसाब अल्लाने केला. पण त्याच अल्लाने दाखवून दिले कि तू “बाप्यो” नाहीस. शरफू शांत असतो. “बोला आता चिप का ऱ्हेलांव…बोला सगळ्या जमातीसमोर काय ती खरा भायेर येंव दे..” आयेशा बिनतोड सवाल करते आणि शरफू जागच्या जागी कोसळतो. कथा संपते.

तिसरी कथा आहे ती लहानूची आणि त्याच्या आसपासच्या जगाची. बायको रखमी, सासरा साहेबराव आणि दौलत जो लहानूच्या कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट आहे. दौलत आहे ६२ वर्षाचा. त्याची आणि लहानूची गट्टी जमते कारण आवडीनिवडी सारख्या. दारू, सुंदर मुली, वेश्या वगैरे. लहानूची बायको श्रीमंताघरची. लहानू मात्र सामान्य कुटुंबातला. मेहनत करून वर आलेला. साहेबराव अत्यंत माजोरडा. आपल्या ३४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून डोक्यावरचे टेन्शन संपवणारा लहानू यापलीकडे साहेबरावाला लहानूची किंमत नाही. तर लहानूच्या मते आपला सासरा म्हणजे अगदी मठ्ठ. फक्त पैसेवाला. साहेबरावाने लहानूला एक पेपर लिहायला सांगितलेला. रिसर्च पेपर. खूप मेहनतीने लहानूने तो पेपर लिहिला. तो पेपर साहेबरावाने आपल्या नावाने छापला. लहानूने विचारणा केल्यावर साहेबरावाने त्याची किंमत विचारली. रखमीचा पवित्रादेखील तोच होता. आपण रखमीबरोबर लग्न करून महाचुत्या ठरलोय असे लहानूला वाटू लागते. रखमी बाळंतपणाला माहेरी गेल्यावर लहानू खुश आहे. दौलतला घरी बोलवतो. दौलत आंटीच्या आठवणीत रमलाय तर लहानू स्वीटीच्या. “यार हगण्यासाठी जेवण जितकं महत्वाचे आहे ना तितकीच क्रियेटीव्ह आयडिया डोक्यातून बाहेर पडण्यासाठी आंटीची जांभूळ महत्वाची आहे.” इति दौलत. दोघे एका बारमध्ये बसलेत जिथे स्वीटी नाचते. तिथेच साहेबराव आलाय. लहानूची फाटते. “आता हा सगळ्या जगासमोर या बारमध्ये आपण येतो याची जाहिरात करणार असल्या मध्यमवर्गिय भित्यांनी त्याचं मन व्यापून जातं.” ही या कथेतली बेस्ट ओळ आहे. साहेबराव टाईट आहे. अडखळतो. आपटतो. सगळे हसायला लागल्यावर तो स्वीटीला बघून म्हणतो..”ये..चूप..चूप बसा..आणि तू गं ये रांडे, साली दुसऱ्या मर्दाबरोबर बसतेस. मी काय छक्का आहे काय..” स्वीटीवर “प्रेम” असल्याने लहानू वैतागतो. साहेबरावावर धावून जाणार इतक्यात स्वीटी म्हणते. “माझे साहेबरावावर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत.” लहानूला धक्का बसतो. लहानू आणि दौलत निघतो. जाताना दौलत म्हणतो..”लहानू, आंटीनेसुद्धा अड्ड्यावर येणाऱ्या एका जंटलमन फॅमिलीतल्या बिघडलेल्या पोराला सुधरवला नि त्याच्याबरोबर लग्न केले.”

नंतरची कथा आहे ती “नशीब.” यातले काही डायलॉग ढासू आहेत. कथा आहे लोके नामक पोऱ्याची जो नशिबाच्या शोधात आहे. माणूस बेकार म्हणजे नक्की काय असतो असे म्हणताना लोके काही मस्त उदाहरणे देतो. त्याचे लग्न झालंय ते त्याच्या प्रेयसीशी एका अटीवर. तू कमावून आणायचे आणि मी खाणार (बापाच्या पैशावर जगणार) कारण लोके नशिबाच्या शोधात आहे. हाय लेवल काँटॅक्ट असल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि त्यासाठी तो काही लोकांची उदाहरणेदेखील देतो. तो म्हणतो,”मी कुठल्या कॅटेगरीत मोडत असेन? रोज पोटभर मला जेवण मिळत होतं. रात्री बायको तिचं शरीर अगदी हवं तसं मला उपभोगू देत असते. मग मीही समाधानीच कि! पण मी कमवत नाही. म्हणजे आधुनिक अर्थव्यवस्थेत व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनी नोटा माझ्याकडे नाहीत. मी जेवतो ते बापाचं व्याज, पेन्शन यातून येतं. रात्री वापरायची निरोधाची पाकिटे बायको घेऊन येते. अंगाचा कपड्याचा साबणही तीच आणते. घरातील दूध, इलेक्ट्रिक, पेपरची बिलं बाप देतो. म्हणजे जगाच्या दृष्टीने मी बेकार, ऐतखाऊ, फुकट गेलेला, उंडारणारा वगैरे ठरलेलो आहे.” आणि लोकेला नशीब सापडतं. पुढची गोष्ट वाचण्यासारखी आहे.

“बेगम” कथा म्हणजे बाईने पौरुष्यावर मिळवलेला विजय म्हणता येऊन शकते का असा मी विचार करत होतो. त्याचे उत्तर होकारार्थी आणि नकारार्थी असे दोन्ही होते. ते कथा वाचल्यावरच ठरवता येऊ शकेल. मी मात्र कथा वाचल्यावर अजूनही विचारच करतोय. त्यातले एक वाक्य आवडले होते. “स्त्री कपड्यात असेपर्यंतच पुरुषाला भुलवते आणि कपडे काढल्यावर सगळ्या सारख्याच.” बेगमवर इब्राहिमचाचाने केलेला अतिप्रसंग आणि नंतर लगेच तिचे लावून दिलेले लग्न. लग्नानंतर दोन महिन्यातच तिचा नवरा, जानिबाबूचे झालेला मृत्यू. आता तिच्या सौंदर्यावर भाळलेले गावातले सर्व पुरुष यावर खुश झालेत. कारण कधीतरी बेगमच्या शरीराचा उपभोग घेता येईल. मग सासऱ्यानेच केलेला बलात्कार. सासरा म्हणतो,”ही बघ पोरी लय माज दाखोव नकु. माझ्याबरोबर नीट ऱ्हेशील तर गावातली इतर लोका नजर टाकया घाबरतील. नायतर गावातलो बाप्यो नी बाप्यो तुज्यासोबत निजया तरसतय.” मला राज कपूरचा “प्रेमरोग” आठवला.

पुढची कथा “रेताड”मध्ये नवरा-बायकोमधला तणाव आहे. मूल झाल्यानंतर बायकोला शारीरिक संबध मान्य नाहीत. त्यामुळे नवरा वैतागलाय. “नवरा-बायको असणं म्हणजे निव्वळ शरीरसंबंध ठेवणं नाही, हे मान्य आहे. मात्र शरीरसंबंध न ठेवता नवरा बायको राहता येत नाही हेही तितकंच खरं आहे.” त्याचे म्हणणे. “अनेक लोक शरीरसंबंध न ठेवताही नवरा-बायको म्हणून आयुष्य काढतात. त्याचं काहीही वाईट होत नाही. आपण लग्नापूर्वी चांगले मित्र-मैत्रीण होतो. लग्नानंतरही तसेच राहू.” तिचे म्हणणे. त्याला वाटायला लागते कि आपल्या बायकोचे अजून कोणाबरोबर संबंध तर नसावे? त्याची अस्वस्थता वाढत जाते आणि अशात त्याची जवळीक एकीशी वाढत जाते. तिचेही लग्न झालेले. मध्यमवर्गीय पाश तोडणे कठीण हे प्रशांतला ठाऊक आहे. मध्यमवर्गीय कल्पनांवर वैतागताना तो म्हणतो..”भांचोद..आयुष्यात कारकुंडेपणा किती असावा याला काही तरी मर्यादा असल्याच पाहिजेत. अत्यंत खालच्या वर्गातील कष्टकऱ्यांप्रमाणे गात्र न् गात्र पार क्लोरोफॉर्म दिल्यागत आउट होईपर्यंत काम करून नंतर आंटीकडे २-४ चौके मारून तर्राट झोपण्याचंही सुख नाही, कि दुनिया झाटावर मारून पैशाचा क्रूर खेळ दर दिवसरात्र करण्याचीही ऐपत नाही. असल्या महाचुत्या वर्गात जन्म घेणं म्हणजे निरर्थकच. अक्षरशः कोणाच्या तरी संभोगाच्या तीव्र इच्छेचं फलीतच असतं ते. तरी बरं आपण साला पुलं, दळवी, बापट आणि तो एक काळा चश्मेवाला कोण तो जी.ए. का काय तो असल्या मध्यमवर्गीय वगैरे जंजाळात सापडून पुरणपोळीमय झालो नाही. डाव्यांशी संबंध आल्यानेच नेमाडे, पाध्ये, लोर्का, पो, नोरुदा, ब्रेख्त कितीतरी जणांच्या खूप गोष्टी समजल्या. खारदांड्यावरच्या आंटीचं प्रेम दारूत कसं उतरतं याच रसायनशास्त्र शिकवणारे सर्जनशील बेवडे मित्र भेटणं म्हणजे, माना किंवा मानू नका, लक फॅक्टरचाच भाग असला पाहिजे.” जिच्याशी जवळीक वाढते तिच्याबद्दल तो म्हणतो. “च्यायला एकंदर या मध्यमवर्गीय बायकांचा प्रॉब्लेमचं असतो. सेक्स स्टार्व्हेशनमधूनच या आपल्यासारख्याला चिकटायला वगैरे पाहत असाव्यात. अन्यथा त्यांना कौटुंबिक चौकटींचे पोपडेसुद्धा उडू द्यायचे नसतात.” तर एकदा म्हणतो..”पश्चिमी लेखकांनी कायम नवं काही तरी शोधण्याचा, मानवी मनाचे वेगवेगळे कोपरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपल्याकडे साला अहंगंड असलेल्या वरच्या जातीतले आणि मध्यमवर्गातले लेखकच मोठे झाले.” त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याने त्याच्याकडून चुका होतायत आणि साहेब त्याला झाडतोय. म्हणूनदेखील तो वैतागलेला. टॅक्सीत “तिचे” चुंबन घेण्यास मज्जाव करणाऱ्या उत्तर भारतीय टॅक्सी ड्रायव्हरवर तो सॉलिड उखडतो. “भ्यांचोद शिवसेना बोलते ते बरोबरच आहे. साला या भय्या लोकांची गांडच मारायला पाहिजे. साले ज्यामच माजलेत. भ्यांचोद काय च्युत्या समजतात आपल्याला. यांना फटकेच द्यायला हवेत. साला फ्युडल देशात साधं इंटीमेट लव्ह अफेअर समजून घ्यायची लायकी नसलेले लोक. कसला फालतू वर्किंग क्लास.” या कथेचा शेवट अस्वस्थ करणारा आहे.

शेवटच्या दोन कथा माझ्या विशेष आवडीच्या कारण त्या राजकारणावर आधारित. आणि या कथा तुम्हाला नाउमेद करत नाहीतच. पहिलीचे नाव आहे. “त्या तिथे.” हौसाबाई, विठू, लारा यांच्या अवतीभवती फिरणारी. लारा श्रीमंत घरातली, विठू एक मागासवर्गीय राजकीय कार्यकर्ता तर हौसाबाई एक दलित राजकारणी. हौसाबाईने चुगली केल्याने विठूवर त्याचा साहेब चढतो. तरी तो इथे खुश आहे. त्याचा मते डाव्या चळवळीतला अनुभव वाईट. साहेबाने झाडल्यावर तो वैतागून म्हणतोदेखील ”यापेक्षा त्या चुतीया बामनांमध्ये मरत होतो ते काय वाईट होते.” पण लगेच पुढे म्हणतो. ”पण तिथे जिंदाबाद मुर्दाबाद करण्यापेक्षा काहीही मिळाले नसते. इथे महिन्याला ५-१० हजाराची तोड तरी होतेय. साला तिथं आम्हाला डिक्लासच्या थेयऱ्या ऐकवणारे रात्री बियर ढोसून चविष्ट आहे म्हणून कुलाब्याला बडेमियाकडे तंदुरी चिकन चापायला सटकायचे. जातीसाठी खावी माती म्हणतात ते चूक नाहीच. साले च्युतीये वर्गलढा शिकवीत होते वर्गलढा. साला प्रत्येकाच्या गांडीखाली गाडी, घरात जंगी फर्निचर, एकेकाचे फ्लॅटसुद्धा साले हजार स्क्वेअरफुटाच्या वरच! आणि तेसुद्धा हटकून दक्षिण मुंबईतच. एखाद्या महिन्यात नवी पोरगी नाही मिळाली तर क्रांतिकारक कामात काहीतरी घोळ असल्यासारखे ते सगळेजण अस्वस्थ व्हायचे. इथं ते तरी नाही. जे काय आहे ते खुल्लमखुल्ला. झवणं झवण्याच्या नावाखाली खाणं खाण्याच्या नावाखाली. पेरूला पेरू बोला, लवड्याला लवडा. झंझटच नाही साला.” विठूला जुने दिवस आठवतात. हॉस्टेल फिवाढीविरोधात एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विठूला बोलावण्यासाठी गायत्री आणि लारा नामक दोन सुंदर गोऱ्या पोरी विठूच्या रूमवर येतात. आधी “मोठमोठ्या घरात राहणारे हे पोट्ट-पोट्ट्या कशाला आपल्यापायी गांड मरवतील” असे विठूला वाटत असते. आणि हॉस्टेलवरच्या त्या शेम्न्या बाबूलाही त्या लोकांसोबत राहू नकोस असे बजावत असे. आपण मागासवर्गीय हॉस्टेलमधले असा हिशोब. तर शेम्न्या म्हणत असे कि..”त्या पोरी माझ्याशी बोलतात म्हणून अख्ख्या हॉस्टेलची शेटं करपतात.” तर विठू म्हणे..”तू त्या पोरींच्या नावानं मुठ मारण्यापलीकडे काही करू शकत नाहीस.” पण विठूला त्यांचा प्रयत्न प्रामाणिक असल्याचे जाणवते आणि तो डाव्या चळवळीत ओढला जातो. विठूला हौसाबाई आवडलीय. तर लाराच्या आयुष्यात प्रथम राजन आणि मग प्रद्युम्न आला. प्रद्युम्ननेदेखील काही कमिटमेंट दिलेली नाहीय. लाराला जुने दिवस आठवतायत. विठू, चौकट, सया यांनी वर्गवास्तवाच्या पलीकडे जाऊनही जातवास्तव आहे हे मांडल्यावर मग पक्ष फुटला होता. “तुम्हाला मादरचोतहो क्रांतीच्या नावाखाली निसती झवाझवीच करायची आहे” या वाक्याबरोबर सगळे संपले होते. हौसादेखील विठूच्या जवळ येऊ लागली होती. विठू गोंधळला होता. कुणाचा सल्ला घ्यायचा म्हणून तो लाराकडे जातो. एकेकाळी त्याला लारादेखील आवडायची. प्रद्युम्न आणि लाराचेदेखील फाटलंय. विठू लाराला सांगतो कि त्याला हौसाबरोबर लग्न करायचे आहे. लारा बोलू लागल्यावर त्याला वाटते कि लारा त्याला सल्ला किंवा नैतिक पाठबळ न देता अनाहूत सल्ले देतेय. मग तो लारावर उखडतो. लारा सीकेपी आहे. तिला बरेच ऐकवतो. “दलित बाई चार पुरुषांबरोबर झोपली तर तिला लगेच समजावणं भाग असतं. का तर तिची कमिटमेंट नाही. मी तिच्याशी ओळख नसताना झोपलो तर ते स्त्रीमुक्तीविरोधी आणि तुम्ही सारेजण करत ते काय क्रांतीसाठी लागणाऱ्या लाल सेनेची निर्मिती व्हावी म्हणून करता काय?” लारा जेव्हा त्याला शोषणमुक्त समाजाविषयी ऐकवते तेव्हा विठू म्हणतो,”लारा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुमच्यापैकी एकाही मुलीनं बहुजन पोराशी संबंध का ठेवले नाहीत? हौसाबाईला शरीरसंबंधांच्या बदल्यात काही अपेक्षा होत्या. तसेच या स्त्रियाही ज्याच्याशी शरीरसंबंध ठेवू त्याच्या आजूबाजूच्या वलयाचा फायदा आपल्याला होईल असा विचार करत होत्या. आता तुझंच घे ना, राजनला फक्त पोपटासारखं बोलत यायचं. जातीचा प्रश्न काढला कि संपायचा. बाबासाहेब भांडवली इंटेलिक्चुअल होते हे एकच पालुपद सुरु करायचा. मिसळपावनं त्याला जुलाब व्हायचे. तुझ्यासारख्या हुशार बाईलाही त्याने भारावून टाकलं कि नाही? सगळ्याच उच्चजात वर्गाच्या लोकांसाठी क्रांती ही पोटाखालच्या भागापुरतीच असते कारण त्यांच्या पोटाचे प्रश्न सुटलेलेच असतात.” विठू निघतो. पण हौसाबाईदेखील आपल्या फायद्यासाठीच सगळे करणारी असल्याने त्याचा भ्रमनिरास होतो. तो अस्वस्थ होतो. रात्री तो बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येतो. पुतळ्याशी बोलतो, त्याला बरे वाटते. हौसाशी सगळे खरे खरे बोलून पक्ष सोडून द्यायचा या निर्णयाप्रत येतो. रात्री उशिरा घरी येतो. सकाळी त्याला कळते कि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झालीय. तो धावतच पुतळ्याच्या ठिकाणी येतो. तर पोलीस त्याच्या अंगावर येतो. “साल्यांनो सवलती घेऊन तुमच्या गांडीला दात आलेत. फुटा इकडून.” पण पोलीस काय त्यांचा बापसुद्धा जय भीमवाल्यांशी नडायची वार्ता करताना विचार करतात हे जाणत असल्याने विठू मागे वळतो. त्याला पोरांकडून कळते कि हा प्रकार मुद्दामहून घडवला गेला आहे. विठू लाराला फोन लावून बोलावतो. होस्टेलची पोरे संतापाने रस्त्यावर उतरतात. गोळीबार होतो. चार मुडदे पडतात. व्यवस्था हातात असणाऱ्यांनी गंमत म्हणून शिकार करावी तशी त्याच्या जातीची माणसं टिपली होती. विठू अस्वस्थ होतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे बघत राहतो. कथा संपते.

शेवटची कथा आहे ती “तवंग नाही तलावात.” ही कथा फिरते ती शिवाजी वनारसेच्या अवतीभवती. कामगार मंत्री आहे तो. मंत्री झाल्यावर “पक्ष चालवायला पैशांची गरज असते” असा सल्ला त्याला वरून मिळालेला असतो. शिवाजीला आपला भूतकाळ आठवतो. डाव्या चळवळीतून तो इथे आला आहे. तो जळगावचा. उच्चशिक्षणासाठी मुंबईत आला. कॉलेजातल्या ब्राम्हण, सीकेपी आणि सारस्वत पोरी वरचा वर्ग पाहूनच लाईन देतात तर मराठ्यांच्या पोरी बहुतांश वेळा भाऊबीजचं करून टाकतात हे त्याला लक्षात आल्यावर या महानगरीचं मागासलेपण त्याला खाऊ लागलेलं. त्यापेक्षा गावाकडे एखादी सुस्वरूप तेली पोरगी सहज फिक्स झाली असती असे त्याला वाटते. सिद्धार्थ बनसोडे त्याला भेटतो. त्याची स्थिती अतिशय हलाखीची. पण तेली समाजाच्या हॉस्टेलवर सिद्धार्थला प्रवेश मिळत नाही. शिवाजीला हा अपमान वाटतो. फाट्यावर गेला समाज म्हणत तोदेखील हॉस्टेल सोडतो. शिवाजीला सिद्धार्थसोबतचे संघर्षाचे दिवस आठवतात. ते दोघे एकाच रूमवर राहायचे. राहायला जागा फुकटात मिळालेली त्या बदल्यात दोघांना कम्युनिस्ट वर्गांना हजेरी लावायला लागायची. सिद्धार्थ तर खांडेकर आणि पांडेपर्यंत सगळ्यांना पार मूर्खातच काढतोय. ”त्या खांडेकरला काय झ्येटं कळते राव. सारखा आपला गांडीत बोटे घालून चीवे चिवळत इंगेल्स काय बोलला आणि लेनिन काय बोलला सांगत असतो. भानचोद फुले आणि बाबासाहेबाचं काही काँट्रीब्युशन नाय काय? ते त्याला सांगावेसे वाटत नाय.” असं म्हणून सिद्धार्थ त्यांचे वर्ग घेणारा नेता असलेला खांडेकर आला कि हमखास सटकायचा. भाऊ वारल्याने पुढे सिद्धार्थला जागा सोडावी लागते. तो शिक्षण सोडून घर सांभाळण्यासाठी गावी निघून जातो. संधी मिळत आहे म्हटल्यावर शिवाजी डावी चळवळ सोडून देतो आणि वेगळ्या पक्षात शिरतो. मंत्री होतो. पण त्यासाठी त्याला वर २५ लाख पोचवायचे असतात. बरे त्याचे आणि त्याच्या बायकोचे दुसऱ्या पक्षात जाण्यावरून वाजलंय. एकीकडे माझ्या तिघांचे म्हणजे शिवाजी, ती नि त्यांची मुलगी रोझा, पगारात जमणार नाही असे शिवाजीची बायको त्याला सुनावते आणि दुसरीकडे संधी चालून आली असताना त्या पक्षात जाऊ नये असेही सांगतेय. कारण ज्या पक्षात शिवाजी जाऊ पाहतोय, त्याचे नि शिवाजीचे तात्विक मतभेद आहेत. पण तेव्हा तुटपुंज्या मानधनावर डाव्या संघटनेत काम करणारा शिवाजी वैतागून म्हणतो. “साला तो पांडे, पोटभरू माणूस, नोकरी करूनदेखील संघटनेचा ताबादेखील त्याच्याच हातात. भारतीय क्रांतिकारक चळवळींची गांड या मध्यमवर्गीय भटा-बामनांनीच मारलीय.” २५ लाखाची सोय होणार असे पीएने सांगितल्याने शिवाजी खुश झालाय. शिवाय सिद्धार्थ त्याला बऱ्याच दिवसाने भेटला होता. दोघांच्या गप्पा सुरु होतात. सिद्धार्थ म्हणतो,”तुला खांडेकर फळला राव! आपल्याला लय बोर वाटायचं ते बेनं. लोक डोकं खाजवून आठवतात, हा साला गांड खाजवून आठवायचा. बाबासाहेबांचा विषय काढला तर म्हणे ही वॉज सोशल रिफॉर्मीस्ट. च्यायला तुज्या.” शिवाजी म्हणतो,” तू कसा काय इतक्या दिवसांनी सांग.” वीस वर्षापासून ज्या कंपनीत तो कामाला आहे त्या कंपनीच्या मालकाला कारखाना बंद करून टाकायचा होता. सिद्धार्थ त्याला सांगतो,”अडीचशे कुटुंबाची वाताहत होईल राव. साला तू मंत्री झाल्यापासून तुला एकदाही काँटॅक्ट केला नव्हता. त्यामुळं यायलासुद्धा कससंच वाटत होतं. पण आता नाकापर्यंत पाणी आल्यावर काही इलाजच नव्हता. काहीही कर बाबा, पण अडीचशे कुटुंबाची रोजीरोटी टिकव.” पीएने जे गिऱ्हाईक आणलंय ते ३५ लाख द्यायला तयार आहे. पण त्याच्या कंपनीमध्ये टाळेबंदी करायला परवानगी द्यायची आहे. पण शिवाजीची घालमेल सुरु होते. तो प्रचंड अस्वस्थ होतो. कारण सिद्धार्थ त्याच कंपनीत कामाला असतो. पिए विचारतो,”साहेब, काही प्रॉब्लेम आहे का?” शिवाजी सांगतो. पिए म्हणतो,”नो प्रॉब्लेम, त्याचं काम करवून घेऊ.” सिद्धार्थ मस्तपैकी मटणावर ताव मारतोय. शिवाजीची बायको त्याला जेवू घालतेय. त्यांच्या मस्तपैकी गप्पा चालल्यात. शिवाजीकडे बघत तो त्याच्या बायकोला जुन्या आठवणी सांगतो. शिवाजी त्याला म्हणतो “तुझ्या मालकाशी बोलणे झाले आहे. तुझी केस तो वेगळी ट्रिट करेल.” सिद्धार्थ शांत होतो..”बाकीच्यांचे काय?” “हे बघ सिद्धार्थ मुंबईत कुणी उपाशी मारत नाही.” सिद्धार्थ वैतागतो. ”साहेब, तुम्ही घरात बोलावून मीठ चारलंत म्हणून तिखट बोलत येत नाही. पण बाकीच्या कामगारांबरोबर आपन असली गांडूगिरी करू शकत नाही. तुला म्हणून सांगतो कि चामड्याला रंग देण्याचा कारखाना आहे तो. १००% एक्पोर्ट करणारा. पण चामड्याच्या घाणीत काम करायला कितीही पगार दिला तरी दुसरा कुनीही तयार नाही. सगळीच्या सगळी सगळी दलित माणसे निवडून आणलीत त्यानं. १०० % एक्स्पोर्टसाठी १००% दलित. सगळीच माझ्यासारखी सर्वबाजूंनी फाटलेली. थोडा शिकल्यानं काही काळानं कारकुनी कामाची माझी सोय झाली. पण धा-धा तास त्या घाणीत काम केलेल्या माणसाची सुगंधी स्वप्ने कशी मरतात ते मी अनुभवलंय. साला तीस-तीस नि चाळीस-चाळीस वर्षं काम केलेल्यांना हागून पुसलेला कागद फेकल्यासारखा तो भानचोद मालक फेकायला लागलं तर चालंल काय? अरे म्हशीचं दूध कितीही गाढं आणि चविष्ट असलं तरी इमान आईच्याच दुधाशी राखावं लागतं माणसाला. तू कामगार क्रांती सोडलीस ते ठीकाय पण कामगारांची गांड तरी मारू नको बाबा. आनी एक गोष्ट सांगतो. तुमी लोक काय क्रांती वगैरे झ्याटं करनार नाय ही तर पयल्यापासूनच आपल्याला खात्री होती. पण कदी काळी मालदार लोकांचीच गांड हुंगायला सुरुवात कराल असं वाटलं नव्हतं राव.” सिद्धार्थ निघून जातो. कथेचा शेवट नेहमीप्रमाणेच होतो.

यातली एकेक कथा ही एखाद्या अर्कासारखी आहे. आहे तशा या कथा प्यायला लागलो तर गिळू शकणार नाही. अगदी अपचन होईल किंवा हगवण तरी लागेल अशा. आपण ४-५ पाने वाचतो, पुस्तक बाजूला ठेवतो आणि विचार करतो. निव्वळ कथा सांगण्यापेक्षा कथेमागील कथा रंगवण्यात समर कमालीचा यशस्वी होतो. प्रत्येक परिच्छेदात आपल्याला जबरदस्त स्पष्टता जाणवते. काही ठिकाणी तो अगदीच सैल सुटल्यासारखा वाटतो पण कथेची गरज आहे म्हणून असे ढोबळमानाने म्हणता येईल. पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर म्हणतो कि भाऊ पाध्येंचं “वासूनाका” आणि हेमिंग्वेचं “ओल्ड मॅन अँड द सी” ही दोन पुस्तके वाचल्यावर त्याच्या वाचनसवयींमध्ये आमुलाग्र बदल झाला. योगायोगाने “वासूनाका” हे मी नववीमध्येच वाचलेलं. त्यामुळे माझी वाचनाची सवय तिथूनच बदललेली ती आजवर. तेव्हापासून भाऊ पाध्ये नामक लेखक आपला आवडता झालाय तो आजतागायत. पुढे इंजिनियरिंगला गेल्यावर हेमिंग्वे कोळून प्यायलो. त्यामुळे हा कथासंग्रह मला आवडला नसता तरच नवल होते. प्रत्येकाने हा कथासंग्रह वाचावा असाच आहे. अगदी दाहक अनुभव मिळतो, बऱ्याचदा आपण भिरभिरतो. थोडक्यात लोक जे वाचतात त्याचा वास्तवाशी संबंध असेलच असे नाही. समरच्या कथा तो संबंध जोडू पाहतात. स्वप्नातल्या गोष्टीत उड्या मारणाऱ्या प्रत्येकाला या कथा जमिनीवर लोळवतात. सो डोंट मिस!

डॉ. अविनाश.

Comments
 1. विनायक

  एक नंबर. मस्त लिहता डॉक्टर. तुमचे बाकीचे ब्लॉग देखील वाचायला हवेत आता.

 2. MD

  Chhan mastar.Gheun ye pustak 7 la 😛

 3. एकच नंबर ब्लॉग झालाय मास्तर… : )

 4. मस्तच रे मित्रा !!! तोडलस … जिंकलस…

 5. विशाल बागल

  मस्तच मास्तर. समर पण तसा थोडाफार डाव्या चळवळीच्या जवळचा वाटतो त्यामुळे त्याची डाव्या चळवळीची निरीक्षण या पुस्तकात वाचायला मिळतील.

 6. Vachnaich mangta ye book… :)
  hya nondich evdhya bhannat aahet… book vachun tar samadhi lagel… :)

 7. advait deodikar

  good one. recalled good old days when I used to read a lot in marathi fiction.

ADD YOUR COMMENT