जग बदल घालुनि घाव!

नमस्कार,

एकनाथ आवाड या माणसाविषयी मी पहिल्यांदा ऐकले ते २००० मध्ये. कॉलेजमध्ये एक बीडचा मित्र होता. त्याच्याकडून आवाड यांच्याविषयी बरेच काही ऐकले होते. आणि आमचा मैतर एकेक गोष्टी अशा सांगायचा की उत्सुकता वाढत जायची. बीडला जाऊन त्यांना भेटावे अशी इच्छा बऱ्याचदा झाली पण ते काही जमले नाही. त्यानंतर मग अधूनमधून त्यांचे नाव मी पेपरमधून वाचायचो. बरे वाटायचे. सरंजामशाही ठासून भरलेल्या ग्रामीण महाराष्ट्रात आवाड यांचे काम म्हणजे लख्ख प्रकाशासारखे होते. प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणे ही काही सोपी गोष्ट नाही. प्रवाहाच्या विरुध्द पोहणारी माणसे आपल्याला मनापासून आवडतात. तसली माणसे आजकाल सापडत नाहीत. व्यवस्थेला आव्हान देणारी माणसे कालांतराने त्या व्यवस्थेतच विरघळून, पाघळून जातात असा साधारण अनुभव असतो. आवाड हे त्यापेक्षा खूपच वेगळे म्हणून आवडते. नुकतेच त्यांचे एक पुस्तक वाचले “जग बदल घालुनि घाव..”. या माणसाबद्दल प्रेमयुक्त आदर असल्याने नाही पण एकंदरीत पुस्तकाचा बाजच भन्नाट असल्याने मी हे पुस्तक एका बैठकीत संपवले. काही दिवसांपूर्वीच त्यांची मुलाखतदेखील पाहिलेली. पांढरीशुभ्र दाढी असलेला हा रांगडा गडी आपल्याला खूप भावलेला. तेव्हा त्यांच्यावरच्या पुस्तकाविषयी लिहितोय. बाकी वंचित आत्मकथने जशी आम्ही कसे टक्के टोणपे खाल्ले यावर बऱ्यापैकी भर देतात त्याप्रमाणे हे नाही. यात प्रत्यक्ष कृती कशी केली गेली यावर जास्त भर आहे. आणि ते सगळे वाचताना आपण रमून जातो. अर्थात ते सहज सांगितले गेलेले आहे त्यामुळे आपल्याला त्याचे तेवढे गांभीर्य वाचताना जाणवत नाही. पण…! थोडासा विचार केला की कळते की या माणसाने प्रवाहालाच आपल्या दिशेने वळवलंय. पुस्तकाला सुरवात होते ती एका प्रसंगाने. जिजा म्हणजे आवाड यांना महादेव नावाचा एक शेतकरी “जय भीम” करतोय. एकेकाळी जमिन आहे पण औत नाही, बैल नाही म्हणून महादेव काही करू शकत नव्हता. पण आवाड यांच्या भूमिहीन महिलांच्या बँकेमध्ये महादेवची बायको भागधारक आहे. ते आठवून आवाड महादेवच्या गावात केलेल्या संघर्षाला आठवतात आणि म्हणतात आमच्या प्रवासाचे एकच सूत्र होते “जग बदल घालुनि घाव…सांगून मला गेले भीमराव..”

जिजा एका मांग कुटुंबातले. दुकडेवाडी हे त्यांचे गाव. त्यांचे वडील पोतराज. दिवसभर हलगी वाजवून भीक मागायची आणि पोट भरायचे असे सगळे स्वरूप. ते मांगकी करत नव्हते कारण पोतराज. ते म्हणतात माझ्या बापाचा स्वभाव गरीब असल्याने ते कुणाच्या विरोधात जाणे शक्य नव्हते पण बाकीचे आडदांड लोक निमुटपणे गप्प कसे बसतात याचे त्यांना अप्रूप वाटायचे. त्यासाठी ते एक उदाहरण देतात. एका पाटलाला विटाळ वाटावा असे काही केल्याने तो पाटील जोराने शिव्या देऊ लागतो…”ए मांगणीहो, तुमच्या भोकात तापलेली पहार घातली.” आता जिला शिव्या घालतोय त्या केरुबाईला चार धिप्पाड मुले. पण सगळे चिडीचूप बसलेले. याचं आश्चर्य अवघ्या ४-५ वर्षाच्या जिजाला वाटत असते. मोकाट फिरतोय म्हणून जिजा शाळेत जायला लागतो. त्याची मैत्री होती ती फक्त उस्मानसोबत. कारण तो खालच्या जातीचा. अशातदेखील चौथीला तो केंद्रात दुसरा येतो. मग पुढची शाळा दुसऱ्या गावात. इथूनच लहानगा जिजा बंड करायला लागला. मेलेलं जनावर ओढून न्यायला नकार देऊ लागला आणि आपल्या बांधवांनीदेखील ते करू नये यासाठी त्यांना प्रवृत्त करू लागला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सगळ्यांना एकत्र करून गावच्या प्रस्थापित लोकांविरुद्ध उभं करू लागला.

जेव्हा वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या सत्तेला कुणी आव्हान देत असेल तर संबंधित लोकांचा राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. आणि त्यात जर आव्हान देणारा खालच्या जातीचा असेल तर तो अभिमान पार शिराशिरांतून उफाळून येतो. असेच काहीसे जिजाच्या गावात झाले. कोण तो मांगाचा पोऱ्या आम्हाला आव्हान देतो असा आवाज गावच्या पाटील लोकांमधून निघू लागला. आणि मग जिजाला मांग लोकांबरोबरच महारांचादेखील पाठींबा मिळू लागला. इथून खरी लढाईला सुरुवात झाली. ती लढाई होती हक्काची आणि स्वाभिमानाची. अशा सर्व गदारोळात जिजा मॅट्रिक झाला. “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” हे आंबेडकरांचे म्हणणे जिजाला माहित होते. त्यामुळे तो जातीपातीच्या दु:खाला खाऊ पाहत होता. आता जिजा लेनिन, मार्क्स, हिटलर, लिंकन वाचून काढत होता. बॅ नाथ पै आणि आंबेडकरांची संसदेमधली भाषणे त्याने वाहून काढली होती. याच काळात नामांतराची चळवळ सुरु झाली आणि जिजा दलित पँथरकडे ओढला गेला. जिजा म्हणतात. ”नामांतरानंतर झालेल्या दंगली ह्या उत्स्फूर्त होत्या हे साफ चूक आहे.” महार ही जात या जाळपोळीचे एकमेव लक्ष्य होते. गावात महार आणि मांगांची घरे जवळजवळ. पण महाराचे घर जळते ठेवून मांगाचे घर विझवायला दंगेखोर मंडळीच पुढे असायची. त्यांना फुले-आंबेडकरांचे विचार पाळणारा बंडखोर महार नको होता तर मांगकी करणारा, खळं राखणारा, ढोरं ओढणारा, दहा वेळा झुकणारा मांग हवा होता. पण मांगांच्या अनेक पोरांनी ही भेद्निती धुडकावून नामांतराच्या लढ्यात स्वत:ला ओढून दिले. या काळात वर्तमानपत्रेदेखील दलितांच्या विरोधात होती असे जिजांचे म्हणणे आहे. “तू जय भीम बोलायचे सोड, आम्ही तुला सोडतो” असे पोचीराम कांबळेला सांगितले गेले. पण तो बधला नाही तेव्हा त्याला जिवंत जाळले गेले. हे वाचताना अंगावर काटा येतो.

जिजा पुढे म्हणतात कि महारांनी म्हारक्या सोडल्याने त्यांना चेपायचे हे त्या काळच्या सवर्णांचे धोरण होते. पण तरीही जिजांनी पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने डोंगरदिवे नामक मित्राच्या लग्नाची वरात सगळ्यांच्या नाकावर टिच्चून काढली होती. जमेल तिथे प्रेमाने आणि जिथे जमत नाही तिथे मारामारीने, गनिमी काव्याने हे जिजांच्या आंदोलनाचे सूत्र होते. हे सगळे करता करता कॉलेजची फी जमवण्यासाठी जिजांनी जे जे काही उद्योग केले ते वाचनीय आहेत. जिजाचे वडील पोतराज होते. त्यांचे केस कापण्याचा किस्सा एक नंबर भारी आहे. बाबांचे केस जिजांनीच कापले. पण मरीआईचा कोप होईल या भीतीने त्यांच्या वडिलांच्या “अंगात” आले. जिजा म्हणतात, मग मी पहिल्या धारेची दारू घेऊन आलो आणि बाबांना दिली. त्यांनी एका घोटातच ती संपवली. दुसरा कप संपवल्यावर बाबा म्हणाला,”आरं कसली आलीय आय! ह्या मनचंदीमुळेच माजं वाटुळं झालं. ह्ये माजं दात मरीआयनच पाडलं. पोटासाठी मरीआयचं नाव घेऊन नाचलो, पण ह्या सटवीनं इक दिस बरा दिला नाय.” पोतराज म्हणून दाताने कोंबडीचे मुंडके धडावेगळे करावे लागत असे. त्यातच जिजाच्या बापाचे दात पडले होते.

पुढे मग एमएसडब्लुच्या कोर्ससाठी स्कॉलरशिप मिळावी म्हणून मग बरेच हेलपाटे घातले. त्यात जिजा सगळ्या पोरांचा लीडर बनला. एका डिबेटमध्ये जिथे सगळी पोरे नामांतराच्या विरोधात होती तिथे नामांतराच्या बाजूने धडाडून बोलल्याने जिजा पोरांमध्ये फेमस झाला आणि सगळ्यांशी दोस्ती झाली. उत्तम पवार नावाचा एक मराठा मित्र जिजासोबत राहायला आला आणि जिजाचे बरेचसे बारीकसारीक खर्च पवार पाहू लागला. यातून जिजाला एक सांगायचंय की कुठलाही समाज वाईट नसतो तर ती एक प्रवृत्ती असते. शिक्षण संपल्यावर जिजा (सध्याचे वसईचे आमदार) विवेक पंडित यांच्याबरोबर काम करू लागले. पंडित दाम्पत्य त्यावेळी वेठबिगारीच्या प्रश्नावर काम करत होते. जशी महारांनी म्हारकी सोडली तशीच यां आदिवासींनी वेठबिगारी सोडली पाहिजे असे जिजांना वाटत होते. आणि त्यांना हे काम आव्हानात्मक वाटत होते. फुले-आंबेडकरांचा विचार आदिवासींपर्यंत पोचला नव्हता. तो आपण पोचवला पाहिजे असे जिजांना वाटू लागले. आगरी-वैती ही माणसे हाताळायला अवघड असल्याने जिजांनी गनिमी काव्याने काम सुरु केले. त्यांनी आगरी मुलींनाच बालवाड्यांमध्ये कामाला घेतले. याचा फायदा असा झाला की पंडित दाम्पत्याला मारहाण होत असताना जिजा आडवे गेले. आणि जिजांवर काही मुले धावून गेल्यावर ह्या पोरी मध्ये आल्या. “ह्यो आमच्या बालवाडीचा सायेब हाये. ह्याच्या अंगाला हात लावायचा नाही.” अशा त्या पोरी गरजल्या नी जिजांची सुटका झाली. इथे काम करता करता जिजांना वाटू लागले की त्यांनी मराठवाड्यात परतावे. आणि ते कासा या संस्थेत रुजू झाले. आदिवासी माणसांबद्दल ते म्हणतात. “आदिवासी हा जंगलचा राजा आहे हे साफ चूक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना जगावे लागते. वाघ, सिंह हे जंगलाचे राजे असतील. पण आदिवासी नाही. माणसाच्या जीवनाचा संबंध प्राण्यांशी लावणे अत्यंत चूक आहे.” तसेच आदिवासी आणि दलित यांच्यात ते एक निरीक्षण नोंदवतात. “आदिवासींचा संघर्ष गावात फारसा नाही पण दलिताला जर संघर्ष करायचा असेल तर त्याआधी गावगाड्याची घडी मोडावी लागते.”

जिजा एका सभेला संबोधताना!

जिजा एका सभेला संबोधताना!

कासामध्ये आल्यावर जिजा आपल्या कुटुंबासमवेत आले होते. कारण गावातच त्यांचे ऑफिस होते. त्यामुळे त्यांना कामाकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देता येणार होते. जिजा म्हणतात,”आतापर्यंत काही विचार माझ्या मनात पक्के झाले होते. पहिली म्हणजे शत्रूला अंगावर घेण्यात कुठलीही कसर ठेवायची नाही. म्हैस माजावर आलेली नसली तरी तिला गोळी देऊन कंड आणायचा म्हणजे ती बरोबर फळते. म्हणजेच शत्रूला होईल तेवढं ढोसायचं,चवताळत ठेवायचं म्हणजे सामाजिक संघर्षाला वेग येतो. शत्रू चवताळला की अपेक्षित फळ मिळतं. अर्थात बलदंड जनावर अंगावर घ्यायला छातीचा कोट करायचीदेखील तयारी हवी.” गावात आल्यावर त्यांनी आपल्या विरोधात असणाऱ्या सगळ्यांचा बंदोबस्त केला. शिवाय बाकी समाजाशिवाय स्वकीयांशी देखील दोन हात केले. बाबासाहेब महारांचे आणि अण्णाभाऊ आपले असे म्हणणाऱ्या प्राध्यापकाला तिथेच खरीखोटी सुनावली. यातही त्यांनी पोतराजांचे केस कापणे कमी केले नव्हते. मरीआईच्या विरोधात जाणारा म्हणून त्यांना “डेंजर माणूस” वगैरे उपाध्या मिळाल्या. आपल्या गावी आल्यावर जिजांनी गावागावात प्रबोधनासाठी शिबिरे घेण्यास सुरुवात केली. पोतराजाचे केस कापायचे धंदे सुरु असतानाच कारन बंद पाडायचे जिजांनी ठरवले. कारन म्हणजे रेडा अगदी साग्रसंगीत कापायचा. पूर्ण वस्तीला मटण खाऊ घालायचे हा यामागचा हिशोब. हे करतानाच जिजा लॉचा अभ्यास करत होते. तो अगदी चार –पाच वर्षे चालला होता. त्यांनी इक विषय मुद्दाम मागे सोडला होता. जोपर्यंत नामांतर होत नाही तोपर्यंत तो विषय पास करायचा नाही असाच त्यांनी निर्धार केला होता. नामांतर झाले आणि जिजांनी तो विषय पास केला. माझ्या पदवी प्रमाणपत्रावर बाबासाहेबांचे नाव आहे असे जिजा अभिमानाने सांगतात. माजलगावजवळच्या एका खेड्यात लमाण वस्तीला शिवसैनिकांचा उपद्रव होत होता. शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षातील प्रस्थापित गट दलितांकडे विखारी भावनेनेच बघायचे असे जिजांचे मत होते. प्रस्थापित राजकीय पक्षांचे पुढारी कुठल्याही पक्षात असोत, आतून जातबांधवांशी त्याचे लागेबांधे असतात हे एक महत्वाचे निरीक्षण जिजा नोंदवतात. तर त्या गावातच ऑफिस बांधून जिजांनी लमाणांना होणारा त्रास थांबवला. हे करतानाच मांग आणि महार पुढारी लोकांमधला वाददेखील ते पाहत होते. शक्य तेवढा प्रयत्न करून ते वाद कसे मिटवता येतील हे जिजा पहायचे. प्रत्येक वेळी ते सफल होत होतेच असे नाही. पण जिजांनी प्रयत्न मात्र सोडले नाहीत. अंबादास सावणे नामक दलित कोतवालाचा मृत्यू झाला होता तो मृत्यू नसून खून आहे हे जिजा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले. परिणामी सवर्णांनी एका आमदाराचा आडोसा घेतला. बरे तो आमदार पुरोगामी समजल्या जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा होता. त्यानेदेखील आपल्या जातबांधवांची बाजू घेतली. जिजांचे निरीक्षण पुन्हा एकदा खरे ठरले. पण हा प्रश्न लावून ठरल्याने मुख्यमंत्र्यांना गावात येऊन जावे लागले. गावात आंबेडकरांचा पुतळा बसवायचा हे जे अंबादासचे स्वप्न होते ते जिजांनी पूर्ण केले. यामुळे मग “महार मांग माजलेत” अशा चर्चा मराठवाड्यातील गावागावात होऊ लागल्या. यामुळे जिजांना प्रत्येक पाऊल अतिशय योजनाबद्धरित्या टाकावे लागले.

यानंतर पुढची पायरी म्हणजे महाराष्ट्र सरकारने “अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम” हा कायदा मंजूर केला. जिजा म्हणतात हा कायदा पाहून आम्ही उत्साहाने फक्त नाचायचेच बाकी राहिले होतो. ह्या अॅट्रोसिटी कायद्यासंबंधी प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देणे सुरु झाले. १९९१ साली जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी केली जात होती तेव्हा जवळपास ७५ गावांमध्ये दलितांना मंदिरप्रवेश नव्हता. ही सर्व गावे नांदेड, उस्मानाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यातील होती. अन्याय करणारा कुठल्याही जातीचा असो, अन्यायाला वाचा फोडणे हेच जिजांनी ठरवले होते. हे सर्व करत असताना जिजांनी पारधी, वंजारा, मांग, लमाण, यल्लम, कोल्हाटी, बौध्द, भिल्ल, धनगर, चर्मकार, ढोर, कोमटी, मराठा, मुस्लीम, गुजर, ब्राम्हण अशा विविध जातीतील कार्यकर्त्यांची फौज बांधली आणि दलितांवरील अत्याचाराविरुद्ध लढू लागले. मध्ये आलेल्या किल्लारी गावातील भुकंपामध्येदेखील जिजा आणि त्यांच्या संघटनेने जोर लावून काम केले. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर जाहीर केल्यावर थोड्याफार दंगली मराठवाड्यात सुरु झाल्या. पण १९७८ च्या तुलनेत त्या तुरळक होत्या. जिजा म्हणतात, शिवसेनेसारखा पक्ष हा नामांतराच्या बळावरच मराठवाड्यात वाढला. पुढे एका मोठ्या राजकीय नेत्याशी जिजांचे वैर झाले. त्यांनी त्याचे नाव यात सांगणे टाळले आहे. पण मला वाटते तो राष्ट्रवादीचा नेता असावा. ते म्हणतात, हा दुश्मनदावादेखील मी फार इमानदारीने निभावला. पुढे २००४ मध्ये जिजांवर हल्ला झाला. त्यांनी तो समर्थपणे निभावला. ज्यांनी वार केला ते जिजाच्या जातीचेच. वार करणारा तो मनुष्य होता ज्याला जिजांनीच मदत केली होती. खंडणी गोळा करतो म्हणून जिजांनी त्याला हाकलून दिलेले. त्याला या नेत्याने फूस लावून आपल्या संघटनेत आणलेला. आणि त्यानेच हल्ला केला. २ ऑक्टोबर २००६ ला जिजांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. हे सगळे करत असताना त्यांनी भूमीहीन लोकांसाठी बँक स्थापन केली जिची रिकव्हरी ९८% आहे. गायरान जमिनीची चळवळ तर उभी केलीच होती.

पुस्तकाच्या शेवटी जिजा एक किस्सा सांगतात. “मी एका पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तकं चाळतोय. एक म्हातारीही तिथं आलीय. अशिक्षित,अडाणी दिसतीय. दुकानदार म्हणतो,”आजी तुम्हाला परवडणार नाही. ठेवा पुस्तकं खाली.” म्हातारी विचारते,”बाबा, काय किंमत पुस्तकाची?” दुकानदार म्हणतो,”अडीचशे रुपये.” म्हातारी कनवटीच्या पिशवीतून अडीचशे रुपये काढते. दुकानदार म्हणतो,”आजी, दोनशेच द्या. तुम्हाला पन्नास रुपये डिस्काऊंट.” म्हातारी म्हणते,”माज्या बाबासायबाच्या पुस्तकाचं करू व्हय रं लेकरा? मला वाचता येत नाय. माझ्या नातवाकडून मी ह्या पुस्तकाचा शबुद न् शबुद वाचून घिईन. घे हे पैशे.” म्हातारी निघून जाते. मी तिला पाठमोरी पाहत राहतो..किती वेळ कळत नाही. किती तरी वेळ..डोळे भरून येतात. अशा सुवर्णक्षणांसाठी मी जगात आलोय.” आपणदेखील स्तब्ध होतो. पुस्तक संपते. एकनाथ आवाड यांना कडक सॅल्युट मारून आणि जय भीम करून आपण शांत होतो. एकदा अनुभवून पहा हे पुस्तक!

 

डॉ. अविनाश.

(पुस्तक कितीजण वाचतील हे माहीत नाही पण जिजांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत इथे पाहू शकता. :) )

Comments
 1. अमोल म्हात्रे

  एकनाथ आव्हाडांना सलाम ठोकावाच वाटतो. त्यांच्या कामाकडे पहिले कि हर्क्युलिस आठवतो.
  समाजसेवेच्या नुसत्या बाता मारणारे मग नुसते माकडछाप वाटू लागतात.
  आणि हो …. लिंक साठी धन्यवाद.

 2. Nil Tambe

  blog ekdam mast ahhe , mazya kadun hi eknath avhad yana jay bhim!!!

 3. ashwin

  Fantastic read……Your analysis is also gr8…have to read this book now ….aaj atta taabadtob..

 4. Sandeep Patil

  Jijana…MANAPASUN SALAM!!!!

 5. arati dikshit

  उत्तम।! लिंक एकदम उपयुक्त … चारही भाग पहिले. त्यातला आई चा प्रसंग, ३ लाख गाडी आणि driver, महिलांची बँक यांचा किस्सा एकदम अफलातून

 6. सागर

  मी जिजांच्या गावचाच.बऱ्याच वेळा भेटलो आहे त्यांना.
  उत्तुंग व्यक्तिमत्व.

 7. Ganesh

  http://www.ibnlokmat.tv/ interview link is not active, please suggest alternative.

ADD YOUR COMMENT