दोन लग्नांच्या आजूबाजूची गोष्ट!

नमस्कार,

कुणाच्याही लग्नाला जायला तसा मी नाखूष असतो. सो कॉल्ड रूढी आणि बाकी ‘गंमत’ डोक्यात जातात. त्यात उत्तरायण असेल तर सहसा टाळतो. उत्तरायण म्हणजे नाशिकच्या पुढे वगैरे. पण एका वर्षभराच्या कालावधीत चक्क दोनदा जळगावला जाउन आलो. तेदेखील लग्नासाठी. दोन लग्ने होती. एका गेल्या मार्चमध्ये आणि एक आता जानेवारीमध्ये. गेल्या मार्चमध्ये ‘ईनर सर्कल’मधील जग्गूचे लग्न होते तर आता प्रशांतच्या लग्नाला जाऊन आलो. दोघांची गावे जवळपास. अगदी लागून लागून त्यामुळे किस्सेही तसेच लागून लागून.

जग्गूचे लग्न जळगावला आहे म्हणता म्हणता ते चोपड्याजवळ निघाले. पुढे सांगतोच. शनिवारी सकाळी मी आणि आशय निघालो. डोंबिवलीला पोचलो. आशय रात्री घरी लेट आलेला. त्यामुळे जरा उशिरा ठाण्यात आला. ८.३० ला पोचलो. राहुल नेहमीप्रमाणे शाही थाटात लेट येईल असे आशयला सांगितले आणि झालेही तसेच. सोबत गुंड्या, निखिलदेखील होते आणि आमचा प्रवास सुरु झाला. सहसा कुठेही ओरिजिनल न मिळणारी मार्लबोरो हार्ड डोंबिवलीत ओरिजिनल मिळाली आणि दिल खुश हो गया. राहुलने गाडी मारली. आम्ही सगळेच आळशी ड्रायव्हर असल्याने त्यालाच गाडी हाणायची होती या कल्पनेने तो जरा बावरला होता. त्यात डोंबिवलीतले रिक्षावाले त्याचे परममित्र. त्यांची आय-माय काढतच तो निघालेला. एकतर तो आहे आड-दांड सहा फुटाचा..वरून दिसतो आगरी. त्यामुळे त्याच्या नादाला कुणीच लागत नाही. सगळे निमूट एकतर बाजूला होतात नाहीतर पुढे निघून जातात. असो. भिकारी रस्त्यावर टोल भरायचा नाही म्हणून कुठल्याशा आडवळणाने राहुलने गाडी काढली. नाशिक हायवेला पोचलो. आताशा हा रस्ता मस्त झालाय. नाहीतर असला शॉट लागायचा. मला आठवते एकदा एशियाडने नाशिकला चाललो होतो. माझ्या पुढे एक कुपोषित सरदारजी बसला होता. कुपोषित अशासाठी की त्याचे वजन ५० किलोदेखील नसेल. वय मात्र ५० च्या वर असेल. तो ड्रायव्हरच्या अगदी मागे बसलेला. आधी रस्ता एवढा निमुळता की ड्रायव्हरला प्रत्येक गाडी ओव्हरटेक करण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे सरदारजी एकदम वैतागलेला. दर पाच मिनिटाने सीटवरून उभा राहून ड्रायव्हर कसा ओव्हरटेक करतोय हे पाहायचा. शेवटी गाडी इगतपुरीजवळ थांबली. धाप लागलेला सरदारजी पहिला मुतारीत जाऊन ‘मोकळा’ होऊन आला आणि ड्रायव्हरकडे जाऊन बोलला,’तुम धीरेसे ओव्हरटेक नही कर सकते क्या?’ ड्रायव्हर उत्तर न देता खो-खो हसायला लागला. सरदारजी अजून वैतागला. ‘अगर मैं गाडी में मर गया तो जिम्मेदारी तुम्हारी!’ असे म्हणून गाडीत जाऊन बसला. असो. तर आम्ही हायवेला लागलो. ऊन तर प्रचंड. जसे मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून बाहेर राज्यात कसे छान चालले आहे असे राजकारण्यांना वाटते तसे आम्हाला एसी गाडीत बसून बाहेर दिसणाऱ्या प्रत्येकाबद्दल वाटत होते. मध्येच चहा प्यायला म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो.

हायवेला असलेली हॉटेल्स आणि धाबे मुळातच आपल्याला प्रेमात पडतात. रात्री त्यांचे सौंदर्य तर खुललेले असते. पण अशा वेळी जिथे एसटी किंवा अन्य खाजगी गाड्या थांबतात अशा टिपिकल हॉटेलमध्ये ती मजा नसतेच. कारण एकच नुसता गडबड गोंगाट असतो. ड्रायव्हर आणि त्याचा मैतर कंडक्टर हे दोघेच तसल्या हॉटेलमध्ये निवांतपणे जेवतात. बाकी सगळे प्रवासी कुठे गाडी थांबवली या आविर्भावात काहीतरी खात असतात. स्वतची गाडी काढली की   मग एखादे शांत हॉटेल निवडायचे, जिथे खरेतर जेवण वगैरे तयार नसते. प्रत्येक ऑर्डरला वेळ लागतो पण शांतता लाभल्याने काही फारसे वाटत नाही. त्या हॉटेलमध्ये मग ऑम्लेटपाव खाऊन पुढे निघालो. कसाऱ्याला पोचल्यावर येताना सगळ्यांना पाणीवाल्या पोराला भेटू असे सांगितले. तो योग काय जुळाला नाही. गाडी हाणताना राहुलच्या तोंडाचा दांडपट्टा सुरूच होता. तो गाडी चालवताना असला वैतागलेला असतो की बास. समोरच्याने लेन सोडली की याची संस्कृत सुभाषिते बाहेर येतात. संपूर्ण सुभाषितमाला संपल्याशिवाय तो काही ऐकत नाही. आम्ही खीखी करायला असतोच म्हणा. नाशिकवरून गाडी जाणार म्हणजे मी दिवट्या बुधल्यालाच जेवणार हे ठरलेले. माझ्या मते हे जगातील सर्वोत्तम हॉटेल आहे. काय चव आहे राव. कुठलीही थाळी खा एकदम लाजवाब. स्पेशली म्हणजे कोल्हापूर मटण आणि त्यात चुरलेली बाजरीची गरमागरम भाकरी. आहाहा जन्नत. लोकांना कोल्हापुरी जेवण म्हटले की तिखट वाटते. माझ्या मते कोल्हापूरपेक्षा सातारा-सांगलीचे लोक जास्त तिखट खातात. अर्थात भौगोलिकदृष्ट्या हे भाग कोल्हापूरमधलेच असे ढोबळमानाने म्हणता येईल. इकडचा अंडा राईस एक भारी. मेनू बघता बघता मला उडदाचं घुट्ट हे नाव दिसले. आणि मेरा दिल गार्डन गार्डन हो गया. माझा एकदम आवडता पदार्थ आहे तो. पण च्यायला कुणी खात नसल्याने तो मेनूतून काढून टाकावा लागला असे मालकाने सांगितले. पण त्याने मला म्हटले,”जर तुम्हाला वेळ असेल तर मी तुम्हाला खास बनवून देतो. तास-दीडतास लागेल.” आम्हाला वेळ नसल्याने मी नकारार्थी मान डोलावली. अर्थात नाखुशीनेच. हा पदार्थ बनवायला उडीद जात्यावर भरडावे लागतात. त्यात जे उडीद बारीक होतात त्याचे हे घुट्ट बनते. असो .

मस्तपैकी हाणून आम्ही पुढे निघालो. हा रस्ता मस्त आहे. मध्ये नाशिक सोडेपर्यंत थोडासा त्रास. कारण “वर्क इन प्रोग्रेस”चे जागोजागी लागलेले बोर्ड. पण त्यापुढे रस्ता लई भारी. रावल्या खुलला. “दे दणा दण” गाडी हाणायला लागला. मध्ये कुठेतरी असताना जग्गूचा फोन आला. आणि त्याने सागितले की भडगावमार्गे या. लवकर पोचाल. आयला तो रस्ता एवढा खराब होता की बोलायची सोय नाही. रावल्याने वैतागून त्याचे गावाचे नामकरण काय केले हे तोच टाकेल ब्लॉगवर कॉमेंट करताना. मध्ये एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. एकदम कळकट-मळकट हॉटेल होते. हॉटेलचा एकंदरीत अवतार पाहून देशपांडेसेठ चहा पिऊ का नको अशा विचारात होते. “मरत नाय बे तू, पी चहा गुपचूप” असे मी बोलल्यावर गुपचूप चहा पिहून मोकळा झाला. तर मग एकदाचे आम्ही जग्गूकडे पोचलो. हळद सुरु होती. जग्गू अंगाला हळद लावून विको टर्मरिकची जाहिरात करत नकली चाकू लावून सगळीकडे फिरत होता. त्याने आमची “सोय” लावून दिली आणि आमची स्वारी सोनल ढाब्याकडे निघाली. हा ढाबा म्हणजे नमुना होता. वेटरला काहीही विचारले की हे आज मिळणार नाही असे सांगायचा. आम्ही वैतागलो. चिकन चिलीची ऑर्डर दिली. अतिबकवास निघाली. दोन तुकडे कुत्र्याला टाकले तर तोदेखील तोंड लावेना. नक्की चिकनच आहे ना हे असे प्रश्न आम्हाला पडायला लागले. फार विचार न करता आम्ही तिथून कल्टी मारली. पोचलो धनश्री ढाब्यावर. हा मला माहित होता कारण इथे आधी मी येउन गेलो होतो. प्रशांतचे गाव शिरसोली इथून फार लांब नव्हते. तिथेच हा ढाबा आहे. मनमुराद जेवलो आणि येउन झोपलो. देशपांडे बोलला की जिथून संडास जवळ आहे तिथे झोपायचे. मग गच्चीवर झोपायचे ठरले. पोटामध्ये दंगल चालू असल्याने कधीही स्फोटक परिस्थिती निर्माण होण्यासारखी स्थिती असल्याने देशपांडे संडासच्या बाजूला झोपला. सकाळी लग्नाची लगबग सुरु झाली. जग्गू अजूनपण नकली चाकू घेऊनच फिरत होता.

सगळे आवरून मग आमची टूर निघाली चहार्डीला. हे जग्गूच्या बायकोचे गाव. चोपड्याजवळ. रावल्या पुन्हा वैतागला गाडी चालवून. मरणाचे ऊन. जिथे कुठे टोल लागला तिथे सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट किंवा मग फिफ्टी-फिफ्टीचे बिस्कीट पुडे देत होते. सगळे जमा करून ठेवले. परत येताना तेच त्यांना परत द्यायचे होते टोल म्हणून. चहार्डी गाव म्हणजे एकदम आतमध्ये. डोक्यावर ऊन. अशात जग्गूची वरात निघाली. घोडीवर जग्गू बसलेला. एवढ्या उन्हात घोडी आणि जग्गू दोघांनीच संपूर्ण कपडे घातलेले. त्याच दिवशी अजून २-३ लग्ने होती. सगळ्या वराती एकत्र निघाल्या. आणि आमची अवस्था “गेला जग्गू कुणीकडे” अशी झाली. शेवटी तो सापडला. एवढ्या उन्हात पब्लिक फुल जोशमध्ये नाचत होती. आम्ही कुत्र्यासारखे जीभ बाहेर काढून होतो. शेवटी वैतागून गाडीत जाउन बसलो. एसी लावला. तरी गरम होत होते. मग गावठी आईस्क्रीमवाला दिसला. ते खात बसलो. तेव्हा कुठे थोडे बरे वाटले. लग्नाचे सोपस्कार पूर्ण पडल्यावर आम्ही गर्दीतून रस्ता काढत स्टेजवर पोचलो. फोटू काढून निघालो. येताना अमळनेरमार्गे आलो. रस्ता बराच होता. सगळे थकलो होतो. म्हणून शांत होतो. येताना पुन्हा दिवट्या बुधल्यामध्ये जेऊ असे ठरले. निघालो. यायच्या वेळी काही छान छान मंदिरे रस्त्यात लागली होती. त्यामुळे एका मंदिरात जाऊ असे रावल्याला सुचवले. तोदेखील तयार झाला. माझा प्लान वेगळाच होता. तिथे जाऊन त्यासमोर दिसणाऱ्या सूर्यचंद्र की काय नामक मंदिरात शिरायचे असा माझा प्लान होता. रावल्याला जर बोललो असतो की तिथे चल तो तो तयार नसता झाला. कारण ते टेकडीवर होते. त्या मंदिरात गेलो. म्हणजे मी बाहेरच होतो. माझी नजर टेकडीवरी. तिथे थांबलेल्या एका क्वालीसवाल्याने सांगितले की,”मी तर ही गाडी घेऊन वर गेलेलो. जा बिंदास.” रावल्याला पर्याय उरला नाही. आम्ही गेलो वर. एव्हाना अंधार पडलेला. रस्ता एकदम भिक्कार नी वळणावळणाचा. त्या क्वालीसवाल्याने आम्हाला येडा बनवला हे आम्हाला कळून चुकले. आम्ही असे घाबरत वर चढताना आमच्या मागून एक बाइकवाला बायको आणि पोराला घेऊन सुसाट निघून गेला. रावल्या अजून वैतागला. आम्ही वर पोचलो खरे पण त्या मंदिरापर्यंत जायची हिम्मत झाली नाही. “आयला ह्या मास्तरला ना काही धंदे नसतात. कधी काय सांगेल याचा नेम नाही.” रावल्या गरजला. मी चिडीचूप. हळूहळू खाली उतरलो आणि घरची वाट धरली. जर आम्ही थोडे जरी चुकलो असतो तर साला सरळ १०० फुट खाली हायवेवर कोसळलो असतो. वाटेला लागून थोडे पुढे आलो तर नाशिकला प्रचंड ट्राफिक. मग दिवट्या बुधल्याचा प्लान रद्द करून सरळ घरी पोचलो. घरी पोचेपर्यंत गाडीत बसून बसून आमच्या पार्श्वभागाला चांगलेच फोड आले होते. बरे स्कोर सांगायचा राहीलाच की राव. संपूर्ण प्रवासात स्कोर ५-१ असा झाला. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या धड्कीने पाच कुत्रे आणि एक मांजर मेलेले आम्हाला आढळले. असो.

पुढचा किस्सा अगदी आताच्या ४ जानेवारीचा. आमच्या परमशिष्यांपैकी एक प्रशांत वाणीसेठ यांचे लग्न ठरले. तेदेखील आमचीच एक विद्यार्थिनी अश्विनी उर्फ पांडासोबत. प्रशांतने खूप आधीच सांगितले होते की,”सर, वेळ काढून या.” या आदेशाबरोबर मी वेळ काढला होता. सोबत होती सकपाळसेठ यांची. तेदेखील तेव्हा इथेच प्रस्थानास होते. चेतनचे आणि माझे शेड्युल एकदम व्यस्त असल्याने आम्ही डायरेक्ट ११.३० ला ठाणे स्टेशनला भेटलो. ट्रेन होती १२.०५ ची. थोडी लेट होती. मी आणि चेतन दोघेही जाम थकलेलो. ट्रेन मिळाली की सरळ आडवे व्हायचे असा उदात्त विचार आमच्या डोक्यात सुरु होता. ट्रेन आली. बरे त्याआधी आम्ही आमचे नाव चार्टमध्ये शोधत होतो. सापडले नाही. पण तिकीट कन्फर्म असल्याने जाऊ दे ना..ट्रेन आल्यावर बघू असा विचार केला ट्रेन आली आम्ही चढलो. तिकीट नंबर नक्की तोच आहे का असे वाटले म्हणून टीसीला विचारावे असा विचार त्याला आम्ही विचारले. त्याने बॉम्ब टाकला. तिकीट ४ तारखेचे आहे. आज ५ आहे. बारा वाजल्यानंतरची गाडी असेल तर हा असला भिक्कारचोट लोचा नेहमी होतो. मला तशी शंका वाटत होती पण इतर कुणाही सामान्य माणसासारखाच माझा स्वत:वर जब्बरदस्त आत्मविश्वास आणि घात झाला. मी आलो गाडीच्या बाहेर. चेतन विचारतो.”सर काय झाले?” मला जाम हसायला आलेले. चेतन वैतागला आधी. मग तोसुद्धा लागला हसायला. मला ती म्हण आठवली. “When rape is unavoidable, lay down & enjoy it.” आधी मनात आले. “जाऊ दे तिच्या मायला, सरळ घरी परत जाऊ. पण मग विचार केला. जाऊ असेच फिरत फिरत. पोचू तेव्हा पोचू. थोडी आपले लग्न आहे. प्रशांत/अश्विनीला तोंड दाखवले की संपला विषय.” चेतन तर मस्तपैकी कॅमेरा वगैरे घेऊन आला होता. दोन दोन मिनिटांनी “कसे चुतीया बनलो” या विचाराने आम्ही दोघे एकमेकांना बघून फिदीफिदी हसत होतो. “सर, आता काय करायचे?” चेतनचा सवाल. तसा तो निर्धास्त होता. कारण माझ्या गाठीशी असलेला प्रवास अनुभव. सर, नको तिकडे फिरायला जातात तर जळगाव काय चीज आहे अशी त्याची देहबोली होती. “आता जर घरी गेलो ना, तर बाबा चढतील. त्यापेक्षा जाऊ सर. जमेल तसे.” मी मान डोलावली. रिक्षा पकडून आम्ही खोपटला आलो तर सव्वाएकला शेवटची संगमनेर गाडी आहे असे सांगितले गेले. तितक्यात एक खाजगी बसवाला आला “नाशिक नाशिक” करत. मी आणि चेतन चढलो गाडीत. पण जागा होती एकदम मागे. लगेच खाली उतरलो. सव्वा एकच्या बसची वाट बघू असे ठरवले. त्याआधी एक त्र्यंबकेश्वर गाडी आली. ती फुल्ल होती. थोडे लॉजिक लावले. जर पुढची गाडी भरलेली असेल तर बसा बोम्बलत. चेतनला बोललो. “चल, स्टेशनला जाऊ. तिथे कुल कॅब असतात रात्रभर. ती करून जाऊ नाशिकला.” चेतनला अर्थात मान डोलावण्याशिवाय काही पर्याय नव्हता म्हणा. खोपटबाहेर आलो. रिक्षावाले माजलेले नेहमीप्रमाणे. बसायच्या आत ५० रुपये होतील असे सांगून रिक्षावाला मोकळा. मीटर बंद आहे हे पालुपदसुद्धा जोडलेले. स्टेशनपर्यंत फारतर २५ रुपये होतील असं माझा अंदाज. मागच्या रिक्षात जावे म्हटले तर त्याचाही मीटर “बंद” होता. आयला सरळ सरळ आम्हाला मूर्ख बनवत होते. मग “माजलेत भडवे” असे त्यांना तोंडावर म्हणत मी आणि चेतन पुढे आलो. बरे एक सांगायचे राहून गेले. हे सगळे रिक्षावाले “मराठी” होते. असो. पुढे आलो की रिक्षा मिळाली. २५ रुपयेच झाले. चेतनला बोललो,”बघितले, किती माज असतो. आपण सहन करतो म्हणून ते अजून माजतात. चूक आपलीच.” चेतन माझे प्रवचन ऐकायच्या मूडमध्ये आला होता. कारण आम्ही “निवांत” जळगावला पोचणार हे एव्हाना अधिक स्पष्ट झाले होते. स्टेशनवर पोचलो. कॅब पाहिली. १७०० रुपये लागतात. ती आम्ही फिक्स करणार इतक्यात नेहमीप्रमाणे माझी ट्यूब पेटली. ही ट्यूब कंजूसपणाची असते. कशाला एवढे पैसे घालवायचे? चेतनला बोललो. “थांब, कसारा लोकल आहे का पाहू.”

आणि पंधरा मिनिटांनी शेवटची कसारा होती. आम्ही धावत स्टेशनला आलो आणि तिकीट काढले. ट्रेनची वाट बघताना चेतनच्या भावाचा एसएमएस आला. “ट्रेनमध्ये चढलास का नीट?” असं काहीतरी. चेतन आणि मी जोरजोरात हसायला लागलो. ट्रेनमध्ये चढलो. थंडी मजबूत. टिटवाळा सोडले आणि थंडी वाढतच गेली. चेतनकडे हूडी होता. माझे एव्हाना व्हॅलेंटाईन डे लागायला सुरुवात झाली होती. कामाचा थकवा असल्याने झोपदेखील आवरत नव्हती. चेतनने कान झाकायला एक वस्त्र दिले. त्यावरच निभावून नेले. जसजशी गाडी पुढे सरकत होती, तसतशी ट्रेन खाली होत होती. नंतर नंतर तर मी, चेतन आणि एक माणूस राहिला. तो आमच्याकडे टक लावून पाहत होता. रिस्क नको म्हणून आळीपाळीने झोपायचे ठरले. मग मी झोपलो नी चेतन जागा. तो माणूस खर्डीला उतरला. तेव्हा मी दरवाज्यात उभा होतो. तो माझ्याजवळ आला. माझा हात मिळवायच्या नादात मला खाली ओढायच्या प्रयत्नात होता. पण मी त्याचा एवढा घट्ट पकडला की “ओम साईराम” का काय म्हणत तो सुमडीमध्ये निघून गेला. डोळे उघडे ठेवून आम्ही कसारा गाठला. आमची फाटली होतीच हे नाकारण्यात काही अर्थ नाही. कसारा पोचल्यावर कळाले एकही काळी-पिवळी नाहीय. पण आमच्यासारखेच गंडलेले काहीजण सापडले. आणि एकूण दहाजण झालो. लगेच एक जीपवाला आला आणि आम्ही निघालो. आधी म्हटल्याप्रमाणे थंडी वाढत होती, त्यात झोप येत होती. आणि आमचा ड्रायव्हर हरामखोर खिडकी उघडून बसलेला. मी तर जाम गारठलो. पण एवढी झोप होती डोळ्यावर की त्याला दोन शिव्या द्यायचेदेखील जीवावर आले होते. साधारण सकाळी ४.३० वाजता आम्ही बॉम्बे नाक्याला पोचतो. या नाक्याला अजूनतरी मुंबई नाका म्हणत नाही. किंबहुना मी तरी असे ऐकलेलं नाही. बरे नाक्यावरच मनसेचे तडफदार आणि लोकप्रिय आमदार वसंत गीते यांचे ऑफिस आहे. त्या ऑफिससमोरून चालत चालत आम्ही महामार्ग बसस्थानकावर पोचलो. आता मी ५०० मीटर चाललो असेन. पण एवढी जबर थंडी होती की अंगावर आहेत नाहीत तेवढे सगळे केस उभे राहिले. नंतर कळाले की त्यादिवशी नाशकातील तापमान ६ डिग्री एवढे होते. असो. बस स्थानकावर पोचलो तर कळाले की जळगावच्या दिशेने जाणारी एकपण गाडी नाहीय. थोडे पडावे म्हटले तर तिकडचे स्थानकावरचे सगळे पंखे चालू. भर थंडीत. कपाळावर हात मारून घेतला. या एका क्षणी वाटले की बास. आता काय जायचे नही पुढे. पण मग करायचे तरी काय? झोपायला जागा नही. काय नाही. मग तिथे कुल कॅब आहे का असे बघायचे ठरवले. महामार्ग बसस्थानकावर मुंबई-ठाणे-शिर्डीला जाणाऱ्या कॅब मिळतात हे माहीत होते. पण जळगावला कुणी तयार होईल का हा प्रश्न होता. पण आमच्या नशिबाने म्हणा किंवा गाडीवाल्याला गरज होती म्हणून म्हणा, एक इंडिकावाला तयार झाला. ३२०० रुपये बोलला. मी काहीही न म्हणता सरळ गाडीत बसलो. पावणेपाचच्या सुमारास आम्ही नाशिकहून जळगावला निघालो. मी आणि चेतन पेंगतच होतो. थोडे उजाडल्यावर मला जाग आली. मग ड्रायव्हरशी थोड्या गप्पा सुरु झाल्या. जेव्हा गाडी उजवीकडे वळून जळगाव रोडला लागली, तेव्हा चेतन पूर्ण जागा झाला. अजूनही मी आणि चेतन एकमेकांना बघून अजून हसत होतो. मध्येच भडगाव लागले. तेव्हा रावल्याला ट्वीट टाकला की त्याचे आवडते शहर आले. मला खात्री आहे तो मजबूत हसला असणार.

साधारणपणे सकाळी ९ च्या आसपास आम्ही जळगावला पोचलो. स्टेशनजवळचे एक हॉटेल बुक केले. बरे रूम चौथ्या माळ्यावर आणि लिफ्ट बंद. हॉटेल मालकाला बोललो. “जळगावचा पाहुणचार सुरु झाला वाटते.” त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. रूमवर पोचल्यावर मग आठवले की आरे पण लग्न नक्की कुठे आहे? प्रशांतच्या गावी की आणखी कुठे? मग नशीब अप्पांचा नंबर होता. त्यांना फोन करून ठिकाण समजून घेतले. त्यात चेतन साहेबांना हगवण लागली. लोमोटील नामक गोळी, जिने बूच लागतो ती घेऊ असे त्याला म्हटले. पण तोपर्यंत तो ४-५ वेळा वारीला जाऊन आला होता. खाली आलो. रिक्षा पकडली. तो १५० रुपये म्हटला. आम्हाला वाटलेले ३००-४०० रुपये म्हणेल. पण हे तर अगदी स्वस्तात झाले. जाता जाता एका मेडिकलमध्ये शिरलो. तिथे लोमोटील नव्हती. कुठलीतरी वेगळीच गोळी होती. ते पण दोन गोळ्या घ्यायला सांगितल्या. मला शंका वाटल्याने चेतनला बोललो,”अर्धी अर्धीच घे. लोचा नको च्यायला.” हॉलवर पोचलो. रिक्षावाल्याने १२० रुपयेच घेतले. “तुम्हाला नाराज करत नाही, साहेब” असे म्हणत त्याने ३० रुपये परत केले. आम्ही काहीही घासाघीस न केल्याने तो ओशाळला असणार. मी आणि चेतन यावर जाम हसलो. असेही लोक जगात असतात. असो. तिथे पोचलो. प्रशांत/अश्विनीला भेटलो. फोटू काढला. चेतनने कॅमेराने फक्त दुसरा फोटू काढला. जेवायचे नाही असे ठरले कारण चेतनचे पोट बिघडलेले. मग मीसुद्धा न जेवता परत निघालो. रिक्षावाला पकडला. त्याने फार विचार करून १०० रुपये सांगितले. मी आणि चेतन अजूनच हसायला लागलो. रूमवर आलो आणि पहिल्यांदा तिकीट चेक केले. रात्रीच्या तोंडावर आपटण्याच्या अनुभवामुळे ते ३-४ दा चेक करणे भाग होते. हे तिकीट बरोबर बुक केलेलं होतं. तरीही जर काही लोचा झालाच तर मग इथेच रात्र काढायची असे ठरले. पुन्हा सगळा जुगाड करत मरायची आम्हा दोघांचीही तयारी अजिबात नव्हती. संध्याकाळी म्हातारड्या साधूच्या शोधात निघालो. बाजूलाच सापडला. मस्तपैकी झणझणीत मटण हाणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. ट्रेन मिळाली आणि आम्ही चक्क सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी इज्जतमध्ये घरी पोचलो.

तर हे असे घडलेले दोन किस्से. योगायोगाने दोन्ही वेळा जळगावातच गेलेलो. लग्नाशिवाय बाकी गोष्टीच जास्त लक्षात राहिल्या. एकदा प्रशांतच्या गावी गेलेलो चेतनसोबत. परत येताना लै धम्माल आलेली. तो किस्सा परत कधी सांगेन. तोपर्यंत हे अनुभवा.

अविनाश.

Comments
  1. भडगावचं नामकरण नाईलाजाने करावं लागलं …रस्ताच इतका खराब होता की नव्या कोऱ्या गाडीची जी काही वाट लागली त्याला वैतागून शेवटी भडगावला “भोसडगाव” नाव ठेवावं लागलं… 😛

ADD YOUR COMMENT