girl

अनन्या…

नमस्कार,

मी तिला नक्की कधीपासून ओळखतो हे आठवत नाही. कारण सध्या माझी अवस्था अशी आहे की मी एकेकाळी जिममध्ये जायचो यावर माझाच विश्वास बसत नाही. असो. तिची आणि माझी ओळख जिममधली. ठाण्यातली एक प्रतिष्ठित जिम. प्रतिष्ठित कारण तिथे लै मोठे मोठे लोक येतात. व्यायाम कमी आणि बाकी टवाळ्या जास्त करतात. त्यांना एका दिवसात दोन बेंच मारले की छाती फुगल्यासारखी वाटते. गंमत म्हणजे काही लोकांना स्टीम घेतली की वजन लवकर कमी होते असेदेखील वाटते. रिसेप्शनला जाऊन इथे स्मोकिंग रूम का नाही अशा तक्रारी करणारे प्रतिष्ठीत लोकदेखील इथे सापडतात. तर सांगायचा मुद्दा असं की अनन्याला भेटलो ते जिममध्ये. सकाळी फार गर्दी असते म्हणून मी थोडा उशिरा म्हणजे ९ च्या आसपास जिमला जायचो. अनन्या तेव्हा कधीतरी दिसायची. तोंडओळख होती. रूढार्थाने ती आकर्षक वगैरे असल्याने प्रतिष्ठीत लोक तिच्याशी ओळख करण्यास फार उत्सुक असायचे बहुतेक. पण तिच्या चेहऱ्यावर खडूसपणा भरभरून होता. “तू किस खेत की मूली” असे भाव तिच्या चेहऱ्यावर सदैव असायचे. आमच्या जिमचे ट्रेनरदेखील लै भारी. एकतर पगार कमी मिळतो म्हणून पर्सनल ट्रेनिंगसाठी बकरे शोधत बसायचे. कुणी नकार दिला याची चुगली त्याला नी त्याची ह्याला हे असले दळभद्री प्रकार करायचे. या सगळ्यापासून दूर असणारी जी काही मोजकी मंडळी होती त्यात मी, अनन्या आणि ७-८ जण होते. आमचे मस्तच जमायचे. सो कॉल्ड प्रतिष्ठित मंडळी सुट्टीच्या दिवशी कधी जिमकडे फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आमचे चांगले फावायचे. जिम आमच्या बापाची असल्यासारखे आम्ही २-३ तास मस्त टाईमपास करून घरी निघायचो. बरे निघायचो तेव्हा संध्याकाळी नक्की भेटायचे हा प्लान करूनच. अशी आमची ओळख वाढत गेली. हळूहळू सगळ्यांची जिम या न त्या कारणाने बंद झाली. माझीदेखील झाली. पण मग तेव्हा ऑर्कुट नी आता फेसबुक आहेच की. सगळे एकमेकांच्या संपर्कात अजूनही आहोतच. अनन्याशी चांगले जमायचे अजून एक कारण म्हणजे आमचे बरेचसे मित्र कॉमन होते. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही भेटायचो.

ती एका मोठ्याला आयटी कंपनीत काम करायची. साधारण मध्यमवर्गीय मुलामुलींप्रमाणे कॉन्व्हेंटपर्यंत न जाता साध्या मराठमोळ्या विद्यालयातून दहावी पास करायचे. या सगळ्यांचे मित्र-मैत्रीणदेखील एकच आडनावाचे. मग बारावीला झेप फारतर केळकर कॉलेजपर्यंत. कारण परत घराजवळ वगैरे. नी मग जशी मेंढरे एकच वाटेने जातात तसेच जवळपासच्या एखाद्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. ब्रान्चेसदेखील त्याच. आयटी/टेलिकॉम वगैरे. मुलींच्या बाबतीत तरी रिस्क घ्यायची नाही असा शिरस्ता. एकंदरीत उपजतच गुण चांगले असल्याने इंजिनियरिंगलादेखील तो खाक्या काही चुकत नाही. चांगले गुण मिळतातच आणि मग आयटी कंपनी वगैरे. हा असा प्रवास अनन्याचादेखील झालेला. तिला या प्रवासाबद्दल बराच अभिमान. आता यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे असे मला वाटायचे. मेंढरे रस्त्याला लागली की बरोबर घरीच पोचतात ना. घर सोडून बाकी कुठे पोचली तर त्याला धाडस म्हणायचे, हे काय तुमचे नेहमीचे भुक्कड प्रकार असे मी अनन्याला म्हणायचो. “तू एक नंबर निच्चड आहेस.” हा तिचा नेहमीचा डायलॉग. सरधोपट मार्गाप्रमाणे तीदेखील एका मोठ्या आयटी कंपनीत लागलेली. तिची आणि माझी ओळख त्यानंतरची एवढेच आठवते. माझ्यापेक्षा एक-दोन वर्षांनी ती मोठी. सालाबादप्रमाणे सगळे जिम मोठ्या उत्साहात लावतात आणि ३-४ महिन्यात सगळ्यांची पुंगी वाजते. इथेही तसेच झाले. फक्त मी आणि अनन्या उरलो. बाकी सगळे भेटायचे पण जिमच्या बाहेर. तेदेखील मामलेदार मिसळ खायला किंवा पूर्वेला असलेले दाल पक्वान खायला. या सगळ्यामध्ये अनन्याशी संवाद वाढत गेला. साधारण सातच्या आसपास आम्ही भेटायचो. तिचा प्रोजेक्ट बहुतेक युकेचा होता. त्यामुळे मग तिचे ऑफिस १२-१ ला असायचे. त्यामुळे ती आरामात यायची ७ ला वगैरे. माझेही तेच. ओळख वाढत गेली. तिला राज कपूर फार आवडायचा. ट्रेड मिलवर चालताना राज कपूरची गाणी ऐकायची. मला तिने एकदा विचारले,”तुझे मत काय राज कपूरबद्दल?” “त्याचे पिच्चर चांगले असतात. पण चित्रपटसृष्टीत रंडीबाजीला प्रतिष्ठा देणारा माणूस वाटतो तो. त्याला एड्स झाला नाही हेच त्याचे कर्तृत्व आहे.” असे मी म्हणून गेलो. माझ्यावर सॉलिड वैतागली. नंतर दोन दिवस आलीच नाही. म्हणून फोन केला तर च्यायला कॉलरट्यून काय तर “प्यार हुआ इकरार हुआ है..” “आयला कंडोमची जाहिरात कुणी कॉलरट्यून म्हणून लावतात काय?” माझा तिला सवाल. “अवि, तू एकदा कुणावर चढायला लागलास न की त्याची काहीही ठेवत नाहीस. तुझी मते असली काही असतात की तुला प्रत्त्युत्तर देणे शक्य होत नाही मला.” “ते जाऊ दे गं. पण आली नाहीस २ दिवस, काय झाले?” “रागावली वगैरे नाही रे. राज कपूर कुठे माझा बाप लागतो. शिवाय तुझ्या बोलण्यात तथ्य आहेच की. डेडलाईन आहे प्रोजेक्टची म्हणून नाही येता आले. रविवारी भेटू तुला वेळ असेल तर.” “ठीक आहे. संध्याकाळी भेटू.” मी बोललो.

एखाद्या सुंदर पोरीबरोबर सीसीडीमध्ये किंवा तत्सम ठिकाणी बसलो आणि ती पोरगी आपल्याशी फार हसून वगैरे बोलत असेल तर आजूबाजूला जळण्याचा वास येणे हे अगदी स्वाभाविक असते. मी नेहमी पलीकडे असतो, त्यादिवशी अलीकडे होतो एवढाच काय तो फरक. आम्ही जवळपास ५ महिने रोज भेटायचो पण २-३ दिवस भेट न झाल्याने मी कातावलो होतो. जास्त कातावलो होतो कारण तिने माझ्या कॉमेंटस् फार गांभीर्याने घेतल्या असतील म्हणून. पण असे नव्हते. भेटल्यावर गप्पा सुरु झाल्या. आयटीमध्ये काम करणारा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये थोडं खुट्ट जरी झालं तर तो पहिल्यांदा प्रोजेक्ट डेडलाईनला शिव्या देतो, मग आपल्या मॅनेजरला. त्याच्याबरोबर बोलल्यावर कळते की प्रॉब्लेम भलताच आहे. पण तो आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमचे मूळ प्रोजेक्ट डेडलाईन आणि मॅनेजर यात सामावलेले आहे यावरच विश्वास ठेवतो. इथेही तेच झाले होते. “माझा बॉयफ्रेंड भेटला होता रे आणि तो एका नव्या पोरीबरोबर दिसला. मीच खरेतर तर त्याला डीच केला पण मग जाऊ दे. भावना उचंबळून येतातच की. थोडे अस्वस्थ होते. त्यात प्रोजेक्ट होता. झक मारत ऑफिसला जावं लागलं. त्यातून हा सगळा त्रागा.” “आयला हे भारी आहे. स्वत:च बॉयफ्रेंडला सोडायचं आणि वरून तो दुसऱ्या पोरीबरोबर दिसला की कुढायचं. वा अनन्याबाई, प्रगती आहे.” असे म्हणून मी खिदळलो. “आरे त्याला लवकर लग्न करायचे होते आणि त्याचा स्वत:चा फ्लॅट नव्हता. आमची खूप भांडणे झाली यावरून. त्याला घरून प्रेशर होते. नी मला भावनेच्या भरात येऊन लग्न करायचे नव्हते. त्याचा बिझनेस बरोबर चालला नव्हता. म्हणजे अगदीच नवीन होता. तो फार कमावत नव्हता पण कमीही नव्हता. पण माझे स्वप्न होते की संसार नवीन घरात सुरु करायचा. आणि त्याचे म्हणणे की घर घेऊच की लवकर. कुठे पळून जातंय. मला चान्स घ्यायचा नव्हता आणि मी त्याला नकार कळवला. काल जी मुलगी त्याच्यासोबत होती ती त्याची होणारी बायको होती. मी फारच अस्वस्थ होते. त्यात कामाचा लोड..” ती नुसती बोलत होती. सगळ्या गोष्टी सांगत नाही. मी शांतपणे ऐकत होतो. “मी कुठे चुकले? बरोबर तर होते. तुला काय वाटते?” “तुमचे लफडे आय मीन प्रेमप्रकरण कधीपासून होते?” “जवळपास सात वर्षे.” ती म्हणाली. “मग तू चुकलीस. सात वर्षे एखाद्याला ओळखतेस. त्याच्यावर प्रेम करतेस. आणि मग त्याच्या क्षमतेवर तुझा विश्वास हवा की. जर तो नसेल तर सात वर्षे काय केले? गोट्या खेळल्या काय? तू त्याला ओळखू शकली नाहीस, क्षमता जोखू शकली नाहीस हा तुझा दोष. त्याचा नव्हे. असे मला तुझ्या बाजुवरून तरी वाटते.” मी जे काय वाटते ते तिला तोंडावर सांगून मोकळा झालो. ती थोडी अचंबित झाली. म्हणाली,”असे पण असते काय?” मी सॉलिड हसलो. “मग का असू नये? कसले फुकाचे प्रेम केलेस तू?” आणि अजून हसायला लागलो. “माणसाने नको तिथे आणि नको तेवढे प्रॅकटीकल असू नये. आयुष्याची प्रयोगशाळा होते.” ती माझ्याकडे बघतच होती. थोड्या वेळाने आम्ही निघालो. रात्री तिने मला एसएमएस केला. “तू जे काही बोललास त्याचाच विचार करतेय. मला वाटते तू चुकीचे बोलतोयस.” “मी बोललेले तुला पटलेच पाहिजे असा नियम नाहीच ना. ऐकून सोडून दे. आणि तुला ते पटले नसते तर तू त्याचा एवढा विचार करत बसली नसतीस. गुड नाईट!”

पुढचे काही दिवस मीसुद्धा कामात आणि तीसुद्धा. आमचे बोलणे कमीच. थोडेफार मेसेज व्हायचे तेवढेच. एकदा कळाले की ती प्रोजेक्टनिमित्त युकेला चाललीय. तिला भारत सोडून अजिबात जायचे नव्हते. पण अगदीच दबाव आला आणि दुसरा जॉब शोधायची मानसिकता नव्हती म्हणून मग ती जायला तयार झाली. जायच्या आधी तिला भेटलो. तर तिचे गाऱ्हाणे सुरु झाले. अर्थात तिचे प्रॉब्लेम सांगणे सुरु झाले. तिचे एक लॉजिक पटले. ती म्हणाली. “आमच्या इंडस्ट्रीमध्ये सगळे जे कुणी असतात त्यांना मी किती एफिशियन्सीने काम करतो हे दाखवायची मोठी खाज असते. यात सर्वात तळाला काम करणारे मरतात. क्लायंटने रिक्वायरमेंट जर १००० जणांची दिली असेल तर तेच काम आपल्याकडे फक्त १०० जण करतात. म्हणून त्या १०० जणांचे मरण ठरलेले असते. आता बघ, मी चालले युकेला. तिथे तशी गरज ५० लोकांची आहे. आणि आम्ही आहोत किती तर ७ जण. यात काय ते समज.” मी मान डोलावली. मला एकतर काय कळत नाय यातले. युकेवरून मात्र ती महिनाभरातच परतली. मला मेसेज केला. “आवडे, मी परत आले.” आयला, ही कशी काय लगेच आली परत असा विचार करत असतानाच तिचा फोन आला. महिनाभरात काय गंमती-जमती केल्या हे ती मला सांगू लागली. खुश होती ती. “एवढी खुश होतीस तर परत का आलीस? राहायचे ना तिथेच अजून काही दिवस!” मी बोललो. “तो परत आला म्हणून मीदेखील परत आले. पुन्हा प्रेमात पडलेय.” ती बोलली. “सहीच..” “पण अवि, ज्याच्या प्रेमात मी आहे त्याचे लग्न झालंय. पण त्याच्याबरोबर मी खुश असते रे.” ती पंधरा वीस मिनिटे बोलत होती. मी थोडा गंभीर झालो. “हे महिनाभरातले की खूप आधीचे?” “खूप आधीचे. आता कन्फेस केले त्याला इतकेच.” “तू तुझ्या आयुष्यात काय करावेस हा तुझा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे पण एक सांगतो. विवाहित पुरुषाबरोबरच्या संबंधात त्याला काहीच गमावण्यासारखे नसते एवढे लक्षात ठेव. त्याला दोन पर्याय असतात. तसे तुझे नाही आणि त्याच्या बायकोचेही नाही. तो तुला मूर्ख बनवतोय. भले त्याने काहीही कारण देऊ दे.” तिच्यावर थोडा वैतागलोच होतो. च्यायला प्रेम कुणावर पण कसे कुणी करू शकते? प्रेम आंधळे असते की यडझवे असा विचार करत मी झोपी गेलो. उद्या मॉर्निंगवॉकला भेटूच तेव्हा बोलू असा विचार केला. जिम सोडल्यापासून कायतरी करायचे म्हणून मी मॉर्निंगवॉकला जायचो. ती कधीतरी भेटायची. सकाळी काही आमची भेट झाली नाही. तुझ्याशी मला बोलायचे आहे असा एसएमएस तिने मला पाठवला आणि मग डिनरसाठी आम्ही भेटलो. “तुझ्याशी मी फारच मोकळेपणाने बोलते म्हणून सांगते. युकेमध्ये एका दारूपार्टीनंतर माझी त्याच्याशी शारीरिक जवळीक निर्माण झाली आणि मग मला मागे फिरणे मुश्कील वाटायला लागले. सेक्स वगैरे नाही पण बाकी सगळेच झाले. आता काही पर्यायदेखील नाही.” मी सॉलिड हसलो. “आयला ठीक आहे न..तू मज्जा केली नी त्याने पण मज्जा केली. रात गयी, बात गयी, नया दिन नया सवेरा. हे म्हणजे मी त्याला मनोमन पती मानलंय. आता दुसरे कुणीच नाही असे झाले. सोड. आयुष्य पडलंय. विसरून जा. उगीच गुरफटून जाशील. तो मज्जा करील नी तुझे वांदे होतील. धोबी का कुत्ता टाईप.” भेंडी ती चक्क माझ्याशी भांडली. फुल्ल टू “फ“ची बाराखडी. “तुला माझ्या भावनांची कदरच नाही वगैरे.” मी आपलं ऐकत बसलो. आजूबाजूचे लोक पाहत होते. तिने खूप घेतल्याने तिचे असे बरळणे स्वाभाविक होते म्हणा. एक सांगतो. ध्यानात ठेवा की एकट्या पोरीबरोबर कधीच दारू प्यायला जायचे नाही. एकतर भरमसाठ पितात, ओकतात, स्वत:चा डोलकर करतात आणि आपल्याला “सावर”कर बनवतात. घरी सोडायला गेलो तर त्यांच्या घरचे आपल्याला बारमध्ये काम करणारा पोऱ्या (वाचा: बाऊन्सर) समजतात. वरून मूडचा भडका उडाला तर बोंबला. लै चढाचढी होते. मला काय दुर्बुद्धी सुचली नी हिला इथे घेऊन आलो असे वाटले. गप्प सीसीडीमध्ये बसलो असतो. पण ती एवढी चवताळली होती की तिला कॉफीसुद्धा नक्कीच चढली असती. असो. मग तिला सांभाळत घरी सोडले. दोन दिवस काही फोन नाय आला. मी पण टाळले. जाऊ दे तिच्यायला. तिला काही बरे सांगावे तर आपल्यालाच नखे दाखवते असा विचार करत मी पण नाय फोन केला. परत आठवडाभराने मीच केला फोन. उगा विचारायला काय चाललंय. “आरे मस्त चाललंय. प्रमोशन मिळाले. युकेमधल्या जवळिकीचा फायदा मिळाला.” ती चक्क हसली यावर. मला आश्चर्य वाटले नाही. हाफिसात हे असले “सामदामदंडभेद” बरेच होत असतात. पण अनन्या फार लवकर हे सगळे शिकली असे वाटून गेले. तिला योग्य वाटत असेल तर मला अयोग्य वाटून काय फायदा असा साधा विचार करून मी हसण्यात तिची कॉमेंट घालवली.

काही दिवसात नाशिकला जाणे झाले. ती तिच्या एका क्लायंटला भेटायला गेली होती. दुपारी जेवायला काय पर्याय असावेत म्हणून तिने मला फोन केला. योगायोगाने मी नाशकातच होतो. संध्याकाळी निघताना एकत्र जाऊ असे ठरले. आमच्या बोलण्यात व्यत्यय नको म्हणून तिने तिच्या एका ज्युनिअर सहकाऱ्याला पुढे पाठवून दिले. आम्ही कुल कॅबने मुंबैला यायला निघालो. गप्पा मारताना मी तिच्या प्रेमाचा विषय नाय काढला, उगीच वाद नको. पण बाईसाहेब मला सुखासुखी सोडून द्यायला तयार नव्हत्याच. “त्यादिवशी तुला एवढा का राग आला रे?” तिने मला विचारले. “मला राग-बिग नाही आला. पण तुझे पटले नाही इतकेच. आणि कशाला वाद हवाय. सोड ना. वाद घालायचा मूड नाहीय माझा.” मी विषय टाळला. पण ती दारुगोळे घेऊन आलेली. तिला तिच्या निर्णयाचे समर्थन करायचे होते. अगदी कसेही. “तुला माझा राग आला. किंवा पुरुष जातीला राग येतो कारण मी त्याला नादाला लावतेय ना…तसाच तुलाही आलाय.” ती म्हणाली. “तुला तो नादाला लावतोय. विवाहित पुरुष कधी नादाला लागत नाही. नादाला लावतो. अर्थात ती मुलगी शिकलेली, चांगल्या नोकरीला वगैरे असेल तर. बार डान्सर वगैरेच्या नादाला विवाहित पुरुष लागू शकतो. कारण बार डान्सरला ते जमते. बार डान्सरसुद्धा बिझनेसची गरज म्हणून ते करत असतील. भावनिक गुंतवणूक म्हणून नव्हे. तुला जमणार नाही. उगाच खड्ड्यात पडशील. आवर स्वत:ला.” मी वैतागून बोलून गेलो. ती जरा थांबली. “पण माझ्या लॉजिकवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कुठेही चुकत नाही रे.” ती म्हणाली. “जर तुला वाटते की तू चुकत नाहीय तर तू बिलकुल चुकत नाहीयस. पण जर नंतर तुला असे वाटले की तू चुकलीस मग मात्र दोषाचे खापरही तुझ्याच डोक्यावर. त्यात बाकी कुणाचाही दोष नसेल.” मी वपु इष्टाईल उत्तर दिले. माझ्याकडे दारुगोळे तयारच असतात म्हणा. “हम्म. बरोबर आहे तुझे.” तिने थोडी माघार घेतली असे मला वाटले.

तिचा मोबाईल वाजला. तिच्या मते, तिने नादाला लावलेल्या, तिच्या बॉसचा फोन होता. तिने मला शांत बसण्याचे खुणावले आणि फोन स्पीकरवर ठेवला. फोन बंद झाल्यावर मला म्हटली. “तुला काय वाटते की मी याच्या प्रेमात आहे?” मी सॉलिड हसलो. बोललो. “आयला, तुझा बॉस ना तो कोण असतो तो लवगुरू का सेक्सगुरु, त्याच्यासारखा बोलतो. तो आठवला आता. रात्री येतो ना एफएमवर. त्याच्यासारखा वाटतोय. सगळ्या पोरींना तो लवगुरू लै आवडतो म्हणे. तो एफएमवाला जो कुणी आहे त्याला कधी पाहिला नाही. पण त्याची जीभ नक्कीच सहा इंचाची असणार. कुत्र्यासारखी. पोरगी दिसली की बाहेर येणारी.” असे म्हणून जोरात हसलो. तिने हलकीच स्माईल दिली. “मग मी त्याला नादाला लावलाय की नाही?” तिचा आत्मविश्वास आता वर आलेला. “नाही अनन्याबाई. हाड हवे म्हणून तर कुत्रे शेपटी हलवतात. शेपटी हलवली म्हणून कुत्रा मालकाशी प्रामाणिक असेलच असे नाही.” मी हे बोलतो ना बोलतो तिने माझ्याशी पुन्हा भांडण सुरु केले. “तू मला समजूनच घेत नाहीस.” “बाईला “तू चुतीया आहेस” असे बोलता येत नाही म्हणून बायका त्याचा गैरफायदा घेतात. पण तू आहेस हे मी तुला सांगतोय.” मीपण आता वैतागलो. “हरणं वाईट नसते. एकतर्फी पराभव वाईट असतो. नुकसान तुझेच आहे. तुला जेवढा मी ओळखतो तेवढ्यावरून एवढे नक्की की तू त्याच्यात भावनिकदृष्ट्या गुंतणार. एवढं साधं तुला समजत नाही का अनन्या!” मी समजावणीच्या सुरात म्हणालो. “आपल्याला नेहमी पुरुषांच्या एकतर्फी प्रेमाच्या कथा माहीत असतात. पण बाईचे एकतर्फी प्रेम जास्त वाईट असते. त्याच्यावर प्रकाश पडत नाही. हे पुरुष जातीचे करंटेपण.” ती मध्येच म्हणाली. “पण याचा इथे काय संबंध?” “मी माझ्या बॉसवर आधी एकतर्फी प्रेम करायचे. आता आलाय जवळ तर मला त्याचा फायदा घेऊन वर पोचायचंय. असे मी म्हटले तर.” “हे बोलणे सोप्पे आहे हो. त्यासाठी तुमचा स्वभाव बदला. नुसते कपडे बदलून चालत नाही. आणि जर आधी प्रेमात पडली आहेस तर आता तमाम पुरुषजातीवर सूड उगवायचा म्हणून बॉसला पकडला आहेस काय? आरे गाडी चालवायचा अनुभव आहे ना…मग विमान चालवायचा अट्टाहास कर की. कशाला जमिनीवर रांगायचा प्रयत्न चालूय?” मी बोलून गेलो. आमचा हा असला संवाद आमचा ड्रायव्हर कान देऊन ऐकत होता. आम्ही जेव्हा मध्ये चहा प्यायला थांबलो तेव्हा ड्रायव्हरला बोललो. “गाडी नीट चालवा काका. आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.” तो काय समजायचे ते समजून गेला. आता आमचा वाद चव्हाट्यावर आलेला. “हे बघ तू पण ऐकणार नाहीस आणि मी पण. जाऊ दे. कशाला वाद घालतोय आपण.” असे म्हणून मग आम्ही थोडा वेळ शांत बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग मला ती माझ्या सगळ्या डायलॉगची उजळणी करून द्यायला लागली. “आयुष्यात कुणाला किती महत्त्व द्यायचे ठरवले की आयुष्य सुखकर होते.” वगैरे वगैरे. आणि आम्ही दोघे हसायला लागलो. मध्येच म्हणाली. “पण मी काय म्हणते आवडे…मी आकर्षक आहे. सुंदर आहे असे तूच म्हणतोस. मग तुला मी का आवडत नाही?” “प्रत्येक सुंदर स्त्री मग ती भले ब्युटी विथ ब्रेन का असेना, प्रत्येक पुरुषाला आवडलीच पाहिजे असा काही नियम आहे का?” मी तिला थंडपणे उत्तर दिले. मी तोंड वाकडे केले. “हे असले पुरुष या जगात असतात म्हणून आमच्यासारख्या बायकांचा प्रॉब्लेम होतो. आणि तो एफएमवाला आवडायला लागतो.” या तिच्या वाक्यावर आम्ही दोघेही खळाळून हसलो. च्यायला तो ड्रायव्हरपण लागला हसायला. त्याला परत एकदा झापला. यानंतर मग ती तडक ऑस्ट्रेलियाला निघून गेली. कसल्याशा कामासाठी. ईमेल यायचा नियमितपणे. मी नाही काढला विषय पण तिनेच सांगितले, “माझ्या बॉसचा घटस्फोट होईल बहुतेक माझ्यामुळे. काय करू?” मी बोललो. “आता त्याला सोडून दे. एक वर्तुळ पूर्ण होईल आणि नव्या दिशेकडे तोंड करशील.” “तू कधीच सुधारणार नाहीस.” असा एका ओळीचा रिप्लाय तिचा आला.

गेले सहा-सात महिने ती भारतात आहे. माझे आणि तिचे शेड्यूल खूप व्यस्त असल्याने दीर्घ अशा भेटीगाठी होत नाहीत. व्हाॅटस् अॅपवर जे काही आहे ते. कधीतरी दिसलीच तर सिगारेट पिताना दिसते. मला मुलींचे सिगारेट पिणे वगैरे काही वावगं वाटत नाही. आमच्या भागातच तिचे नवीन ऑफिस आहे. तिचा हा सगळा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे थोडे आश्चर्य वाटते. मला वाटते की ती तिच्या बॉसच्या प्रेमात अजूनही आहे. पण तिला अजूनही वाटते की ती त्याला खेळवते आहे. काही माहीत नाही पण मलाही तसे वाटायला लागले आहे आता. कारण कधीतरी एकाची फलंदाजी संपून इनिंग चेंज होतेच की. असो. नववर्षाला शुभेच्छा द्यायला केलेला फोन म्हणून ती आठवली आणि हे सगळे लिहून काढले. मला ती नेहमी सांगते की मी सध्या कोरा कागज आहे रे मी, जे मला पटत नाही. आमचे एकमत होत नाही. सध्या ऑनलाईनच भांडतो. माहीत नाही की कधीपर्यंत आम्ही या विषयावर वाद घालणार? एकदा पुन्हा भेटून वाद घालायचाय. असो. चालायचं.

अविनाश.

Comments
 1. मला सर्वात जास्त आवडलेल्या ब्लॉगपैकी एक… कधी चानस मिळाला तर “अनन्या”ला भेटायला आवडेल…अर्थात तिची काही हरकत नसेल तरच! :)

 2. विशाल ठाकुर

  अनन्या थोडिशी मलेना शी जवळिक साधणारी दिसली……असो……पण छान वाटले….!

 3. A good read. Chan vaatla vachun. :)

 4. vanita sagvekar

  Avinash far awadala. tyachi nikhal ani khari maitri mana pasun awadali.

 5. Abhijit Jagdale

  Khupach chan aahe anubhavaleli Manas.

ADD YOUR COMMENT