आये तुम याद मुझे!

नमस्कार,

खरेतर चित्रपट खूप येतात नी जातात. फार कमी चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. त्यापैकीच एक “मिली”. बऱ्याच जणांना वाटते की बच्चन नी जयाचा “अभिमान” त्यांच्या जोडीचा म्हणून सर्वोत्तम चित्रपट आहे. असेलही. पण मला वाटते की “मिली” कांकणभर सरसच आहे. मला “मिली” जेवढा भावतो तेवढा “अभिमान” नाही भावत. अर्थात दोन्ही चित्रपट ऋषिकेशदा यांचे. त्यामुळे ते ग्रेट यावर माझे शिक्कामोर्तब. अर्थात मी कोण हे सांगणारा! “मिली”मधली गाणीदेखील तितकीच सुंदर आहेत. हे सचिनदा यांचे संगीतकार म्हणून शेवटचे काम होते. किशोरने आपल्या आठवणीत म्हटले आहे की “आये तुम याद मुझे” हे गाणे गाताना माझ्या मनात फक्त आणि फक्त बर्मनदा होते. त्यांचे आणि माझे नाते फार जिव्हाळ्याचे होते. त्या सर्व भावना या गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत. असो.

या गाण्याला पार्श्वभूमी आहे ती दादामुनी आणि बच्चन यांच्या भेटीची. भरपूर लफडी झाल्यानंतर बच्चन मिलीवर प्रेम करतोय. अर्थात आग दोनो तरफ से बराबर लगी है. बच्चनला वाटते की मिली काहीतरी थातूरमातूर कारणाने आजारी आहे. त्यामुळे तो तिच्या आजाराच्या बहाण्याने तिच्याभोवतीचे आपले “नट-बोल्ट” घट्ट करतोय. शेवटचा आटा फीट करायचा म्हणून तो त्याच्या नोकराकरवी पाठवत असलेला पुष्पगुच्छ (ज्यात मिलीसाठी एक चिठ्ठीदेखील असते) स्वत:च घेऊन जायचा निर्णय घेतो. पण त्याला मिलीचा बापूस म्हणजे दादामुनी सापडतो. काय नशीब असते प्रेमवीरांचे. याआधी जेव्हा गोपिकाका (बच्चनचा केअरटेकर) फुले घेऊन जात असतो तेव्हा मिलीची आत्या दरवाजा उघडते. पण मग बाकी बहुतेक प्रेमवीर लोकांप्रमाणे बच्चनचे नशीबदेखील फुटकेच. नेमका मिलीचा बापूस दरवाजा उघडतो. सगळ्या गोष्टी रंगात येतात न येतात तर पोरीचा बाप किंवा भाऊ मध्येच टपकतात. असो. आधीच मायनसमध्ये असलेला बच्चनचा आत्मविश्वास अजून खाली घसरतो. मिली आराम करतेय असे उत्तर दादामुनींनी दिल्यावर पुष्पगुच्छ त्यांनाच देऊन मागे फिरतो. तिचा बापूसच दरवाजा उघडेल याची कल्पना नसल्याने किंवा एकदम तिचा बापूस समोर आल्याने तो चाचपडतो. मागे फिरताना पुष्पगुच्छही देतो आणि त्यात असलेली चिठ्ठीदेखील. सालाबादप्रमाणे कुठ्ल्याही मुलीच्या बापाप्रमाणे मिलीच्या बापाचेही लक्ष पुष्पगुच्छाकडे न जाता त्यात असलेल्या चिठ्ठीकडे प्रथम जाते. क्षणभर मिलीचा बापूस गांगरतो. पण हे गांगरून जाणे थोडे वेगळे आहे. मिलीचा आजार दुर्धर आहे हे दादामुनींना माहित असते. पण बच्चन प्रेमात असल्याने त्याचा नाईलाज असतो. किंवा असे म्हणता येईल तिला त्याचा “इतिहास” माहीत असतानादेखील त्याच्याशी ती प्रेमाने वागत असते. मग त्याला ती आवडायला लागलेली असते आणि अशा प्रेमाला इलाज नसतो. तो पक्का प्रेमात असतो. हे सगळे कळाल्यामुळे मग दादामुनी त्याला समजवायला निघतात. त्याच्या घरी जातात. पण तो अर्थात उखडतो जेव्हा मिलीचा बापूस सांगतो की,”तू तिला विसरून जा.”

पण बच्चन मात्र वेगळेच समजतो. आपल्या बापाने सेक्रेटरीसोबत पळून गेलेल्या आईला आणि तो सेक्रेटरी या दोघांना ठार मारलेले. नंतर बापाला फाशी झालेली. या इतिहासामुळेच मिलीचा बाप तिला विसरून जा असे सांगत आहे असा त्याचा समज होतो. असा समज झाल्याने मग दादामुनीचा नाईलाज होतो आणि तो खरे काय ते बच्चनला सांगतो. बच्चन स्तंभित होतो. दादामुनि म्हणतो,”बेटे, मै उसका बाप हूँ. मेरा रिश्ता तो कम ज्यादा नहीं हो सकता. मगर तुम्हारे सामने सारी जिंदगी पड़ी हुई है. जितना रिश्ता बढाओगे उतनी ज्यादा तकलीफ होगी.” इथे घरी मिली बसलीय. बच्चनने पाठवलेल्या चिठ्ठ्या वाचत. तितक्यात रुना उर्फ अरुणा इराणी येते. अरुणा इराणी चिठ्ठ्या वाचते. मिली म्हणते,”दीदी, तुम उन का जरा ख़याल रखना. वो बहोत अकेले है. रखोगी ना.” पुढे म्हणते,”रोज फूल क्यूँ भेजते है. खुद क्यूँ नहीं आते.” हा संवाद संपतानाच गाणे सुरु होते.

जब मैं रातों में तारे गिनता हूँ…
और तेरे कदमों की आहट सुनता हूँ…
लगे मुझे हर तारा तेरा दर्पण…
आये तुम याद मुझे…
गाने लगी हर धड़कन…

बच्चन दिसतो. येरझाऱ्या घालतोय. संपूर्ण घर खाली दिसतंय. एरव्हीही ते असतेच. पण मिलीचे काय होणार या विचारात बच्चन सुन्न आहे. त्यामुळे घरदेखील सुन्न वाटतेय. काही दिवसांपूर्वीच तिथे आनंद बहरत होता. मग तो मिलीच्या रुपात असो किंवा रिहर्सल करणारी लहान मुले यांच्या रूपात. त्यांच्या नादाने एरव्ही सगळ्यांवर डाफरणारा किंवा माझ्या भूतकाळामुळेच हे सगळे लोक असे वागतात असा विचार करणारा बच्चन थोडा का होईना फुलू लागला होता. हे सगळे अचानक कळल्याने तो आता मात्र अस्वस्थ झालाय. येरझाऱ्या घालताना तो स्पष्ट दिसतो. या खोलीतून त्या खोलीत. बसायला जागा आहे. बैठक आहे पण सगळे रिकामे आहे आणि बच्चन सुन्न. एरवी खगोलात रमणारा बच्चन आता मात्र रमत नाहीय कारण त्याचे मन मिलीमध्ये अडकले आहे. आसपासच्या माणसांमुळे भ्रमनिरास झालेला आहे. या पार्श्वभूमीवर तो दूर कुठल्यातरी ताऱ्यांमध्ये सुख शोधत असतो. बच्चनची ताऱ्यांमध्ये असलेली आवड हा निव्वळ योगायोग वाटत नाही तर त्याचा असलेला इतिहासदेखील कारणीभूत असावा असे वाटून जाते. बच्चन आणि मिली..दोघेही दिसतात. बच्चन तिला कायतरी समजावतोय. इथे कुणीतरी चांगले माणूस मिळाले आहे म्हणून तो खगोलापासून थोडासा दूर आलाय. बच्चनला ते सगळे आठवतेय.

तो पुढे गातो.

जिस पल नैनो में सपना तेरा आये…
उस पल मौसम पर मेहंदी रच जाए…
और तू बन जाए जैसे दुल्हन…
आये तुम याद मुझे…
गाने लगी हर धड़कन…

या कडव्यामध्ये दादामुनी दिसतात. त्यांनाच हे कडवे ऐकू येतेय म्हणून किंवा मग बच्चनच्या भावना आणि वास्तव यातले अंतर त्यांच्याशिवाय कुणीही समजू शकत नाहीय. या बच्चनचे काय करायचे या विचारातच ते असावेत. दुल्हन, मेहंदी वगैरे शब्द ऐकल्यावर ते जरा अजून अस्वस्थ होतात. इथे मात्र बच्चनला काही फरक पडत नाहीय. तो त्याच्या विश्वातून बाहेर यायला तयार नाही. आईवडिलांचे असे झाल्यावर त्याला मिली भेटली होती आणि मग तिचे असे व्हावे यात तो गुंतून पडलाय. हा गुंता कसा सोडवावा या विवंचनेमध्ये तो आहे. आज तो पीत नाहीय. नेहमीच दारूमध्ये आपल्या दु:खाचे समाधान शोधणारा बच्चन आता मात्र न पिता विचार करतोय. हा बदल बहुधा मिलीने घडवला आहे. न पेक्षा निरपेक्ष प्रेमाने जे बच्चनला मिळाले नाही किंवा मग ते मिळूनसुद्धा त्याने ते दूषित वाटले असावे. आणि मिली भेटल्यावर मात्र मग सगळे वातावरणच दूषित व्हावे असले काहीतरी झाल्याने तो चरफडतोय. पण काय करावे हे कळत नसल्याने शांत आहे.

दादामुनी त्याच्याकडे जायचा प्रयत्न करतात. पण थांबतात. बहुधा त्याला त्याची वेदना व्यक्त करू दे मग तोच माझ्याकडे येईल असा वयानुसार आलेला शहाणपणा त्यांच्याकडे असावा. ते थांबतात आणि बाल्कनीमध्येच उभे राहतात. त्यांना रडू कोसळते. इथे मिलीसोबत बसून गप्पा मारणारी म्हणा केव्हा तिची अवस्था पाहणारी अरुणा इराणी तिला बाय करून निघते. बाहेर आल्यावर तिला दादामुनी दिसतात. “अंकलजी, क्या हुआ..” दादामुनी मात्र उत्तर देऊ शकत नाहीत. “मिली…” एवढेच उच्चारून आत निघून जातात. अर्थात जाताना मान नकारार्थी डोलावतात. अरुणा इराणी काय ते समजून जाते. हे सगळे घडत असताना बच्चन मागे गातोय.

हर पल मन मेरा मुझ से कहता है…
जिस की धून में खोया रहता है…
भर दे फूलों से उसका दामन…
आये तुम याद मुझे…
गाने लगी हर धड़कन…

गाणे संपते. हा पूर्ण चित्रपट नितांतसुंदर आहे. मला त्यातले हे गाणे खूप भावते. या एका गाण्यात चित्रपटातील सर्व प्रमुख पात्रे दिसतात. या गाण्यानंतर अरुणा इराणी बच्चनकडे जाते. बच्चन मात्र घर सोडून जायच्या तयारीत असतो. कारण तो म्हणतो..जिने मला जगायला शिकवले तिला मरताना मी बघू शकत नाही. अरुणा इराणी त्याला “पळपुटा” ह्या शब्दात हिणवते. शेवटी म्हणते. “पर शेखरबाबू, आप तो एक मामूली आदमी निकले. जाईये..आप शौक से जाईये..मिली आप के बगैर भी मर सकती है.” बच्चन हे ऐकून अजूनच अस्वस्थ होतो आणि तडक मिलीला भेटायला निघून जातो. एकदा अनुभवा!

अविनाश.

(महत्वाचे: “मिली” चित्रपटाला सचिन देव बर्मन यांचे संगीत आहे. असे ऐकीवात आहे की “बडी सुनी सुनी है” या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर बर्मनदा कोमात गेले. मग उरलेले संगीत पंचमने पूर्ण केले. आज बर्मनदा जाऊन ३७ वर्षे झाली. त्यांनाच हा ब्लॉग समर्पित!)

Comments
  1. अतिशय सुंदर..मनाला हात घालणारे असे गाणे..योगेशचे शब्द, बर्मनदांचे संगीत, आणि किशोरदांचे काळजाला कापत जाणारा आवाज…याउपरही, अशोककुमार, अमिताभ आणि अरुणा ईराणी अतिशय कमी शब्दांत जे काही व्यक्त केले आहे, त्याने गाण्याला खरच न्याय मिळाला आहे.

ADD YOUR COMMENT