शाळा….

नमस्कार,

तसे म्हटले तर ही जागा तशी ओळखीचीच वाटते. वर्ग, बाके, समोरचे मैदान..वगैरे…’शाळा’ चित्रपट सुरु होताना हे दिसणारे चित्र….शाळा…म्हटले की मन कसे सर्रकन मागे जाते. तसेच काहीसे हे झाले. मिलिंद बोकिल यांची ‘शाळा’ ही कादंबरी बऱ्याच लोकांनी वाचलीय आणि वाचलेला प्रत्येकजण तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतोच. माझाही याला अपवाद नाहीच. शाळेत केलेले ‘धंदे’ अजून तसेच्या तसे लक्षात आहेत. जसे की काल घडले असावे. विकास हायस्कूलचा आमचा ‘ड’ वर्ग. आजची आम्ही सारे भेटलो की ती धम्माल अनुभवत असतो. वरचेवर भेटणे होत नाही पण जेव्हा वेळ मिळेल आम्ही एकत्र वेळ घालवतोच. ‘शाळा’ ही कादंबरी अगदी थेट तसाच अनुभव देते. पुस्तक वाचल्यावर अगदी ‘ड’ वर्गाच्या नेहमीच्या शेवटच्या बाकावर बसल्यासारखे वाटले. म्हणून यावर चित्रपट येतोय म्हटल्यावर उत्सुकता अगदी ताणून धरलेली. त्यावर कडी म्हणजे ‘शाळा’चे प्रोमोज वर्षभरापूर्वी पाहिलेले. एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती अनुभवायला मिळणार याचा अंदाज होता. पण ही असलेली उत्सुकता तब्बल आठ-दहा महिने थांबल्यावर रबर अति ताणल्याने तुटतो तशी विरून जाते की काय असे वाटायला लागले. पण ‘शाळा’ एकदाचा रिलीज झालाच. अर्थात पहिल्याच दिवशी बघितला. त्याबद्दल थोडेसे..

युट्युबवर प्रोमो रिलीज केल्यानंतर तब्बल एका वर्षाने हा चित्रपट रिलीज झालाय!

‘शाळा’ पुस्तक बऱ्याचदा वाचल्याने त्यातली पात्रे जसे की जोशी, फावड्या, चित्र्या आणि सुऱ्या ही अगदी तोंडपाठ होती. ती पडद्यावर कशी उतरवली आहेत याची उत्सुकता होती. पहिल्याच फ्रेममध्ये शाळा दिसते. शाळेचे टोल ऐकायला येतात आणि आपण आपल्या शाळेत पोचतो. बाई, शिपाई, नववी-ब असे शब्द बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळतात. बिल्डिंगवर त्या पोरांचे जमणे. एकमेकांची उडवणे. खालून चाललेल्या सर किंवा बाईंची उडवणे. जोशीच्या भाषेत चिमण्या म्हणजे वर्गातल्या पोरी. यांचीही मनसोक्त खेचणे. हे असले प्रकार शाळेत सगळ्यांनी केलेले असतात. किंबहुना हे ज्याने केलेले नसते तो शाळेत गेलेलाच नसतो. आम्हीदेखील शाळेसमोरच्या डबल बारवर बसून ह्याची त्याची काढत बसायचो. सगळे आठवून गेले. बेंद्रेबाईंनी दिलेला गृहपाठ केला नाही म्हणून बाई फटकावतात. तेही पट्टीने. लाकडाची. आयला उभी पट्टी कसली लागते. आणि वर्गात अभ्यास करणारा कुणीतरी एक हरामखोर असतोच जो ही पट्टी आणतो आणि बाईंनी पट्टी मागितली की लगेच दुसऱ्यांना पडणारे फटके बघायचे म्हणून दप्तरातून काढून देतो. तसाच हा बिबिकर नावाचा पोऱ्या. आपण नकळत आपल्या वर्गाचे चित्र डोळ्यासमोर उभे करत जातो. काही अंधुक झालेल्या तर काही अगदी स्पष्ट असलेल्या आठवणी समोर येत जातात. सामुहिक प्रार्थनेत जांभया देणे, मागेपुढे आवाज काढणे हे तर नेहमीचेच. जोशीचा नरूमामा. प्रत्येकाला आईचे नातेवाईक जरा जास्त जवळचे असतात. त्यात जर आईला लहान भाऊ असेल तर तो मामा आपला मैतर बनून जातो. असाच आहे नरूमामा. जोशीला आपली ‘लाईन’ सापडलीय. बाकींना ‘लाईन’कडे कसे पहायचे याचे धडे देतोय. पण तो विषय टाळतोय. कारण कुणाला ‘डाउट’ यायला नको. मग त्याचे मैतर असो की नरूमामा..सगळ्यांनाच आपण ‘तसल्या’ भानगडीत पडत नाही असे सांगतो. पण त्याच वेळी मग वर्गातल्या मिसाळला घेऊन ‘शिरोडकर’च्या घरचा पत्ता काढतो. तेही त्याला इंग्लिशमध्ये मदत करेल असे लॉलीपॉप दाखवून. भेंडी कुणाला दगडी विहीर बघायची इच्छा या वयात असते. बरे हे वय आहे नववीतले. दहावीला मजबूत अभ्यास असणार त्यामुळे जी काही ‘मजा’ मारायची ती याच वर्षी हा हिशोब नववीतल्या प्रत्येक पोराने केलेला असतो. जोशीदेखील त्याला अपवाद नाही. प्रत्येकाने आठवा. सहज कळेल की आपण नववीत जरा जास्तच मज्जा केलेली असते. वर्गात येणारी आंबेकर आणि सगळ्या पोरांनी तोंड आ करून वासलेले. बरे ही कॉन्वेंटची. त्यामुळे मराठी माध्यमातली पोरे आधीच तिला टरकून. जोशीला फावड्याच्या दुकानावर शिरोडकर भेटते. आपल्या ‘लाईन’ला पाहून जोशी मात्र बावरलेला. दुकानदार असलेला फावड्या ‘गवारी नको घेऊ. ताजी नाही आहे.’ असे निरागसपणे शिरोडकरला सांगून जातो. ही निरागसता चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जपलेली आहे. जास्त संवाद नाहीतच पण नकळत आपल्याला ‘रीडिंग बिटवीन लाईन्स’ समजत जाते.

जोशी, चित्रे, सुऱ्या नि फावड्या...

आपल्या ‘लाईन’ला रडवले म्हणून जोशीला येणारा राग आणि त्याने खाल्लेले फटके. कधी नव्हे ते त्याच्या आईने आणि ‘अंबाबाई’ने घेतलेली त्याची बाजू. एकेका फ्रेममधून चित्रपट पुढे सरकत राहतो. मध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी आठवतात. की अरे हे नाही दाखवले किंवा ते नाही दाखवले. पण तेवढा वेळच मिळत नाही विचार करायला. चित्रपट स्वत:च्या वेगात सरकतो. जोशी जेव्हा मिसाळला आपल्या ‘अड्ड्या’वर घेऊन जातो तेव्हा वैतागलेला सुऱ्या. जोशी मिसाळला Active Voice आणि Passive Voice शिकवत असतो तेव्हा तर इंग्लिशमधली हे साधे व्याकरण डोळ्यासमोरून जाते. कसले दिवस होते ते. ए फायलम प्रोटो’झोव्या’ म्हणून जोशीला चिडवणे आणि सगळ्यांनी खळखळून हसणे हे निव्वळ शाळेतल्या जिगरबाज दोस्तांची आठवण आणून देते. नरूमामाने सांगितलेले चष्मिस आणि घासू पोरांविषयीचे तत्वज्ञान जोशीला एकदम पटून जाते. त्याने डाव्या हाताने ‘मला इकडे भेट’ म्हणून लिहिलेलं पत्र. कुणाला आपले अक्षर कळू नये म्हणून केलेला हा केविलवाणा प्रयत्न. शेवटी चिठ्ठी फाडून टाक असे लिहिलेलं. ‘सरांना देऊ नकोस’ असे लिहायला जोशी विसरतो बहुतेक. जोशी आणि शिरोडकरचे त्या ‘गल्लीत’ भेटणे तर निव्वळ अप्रतिम. तिने नाजूक आवाजातून त्याला विचारणे आणि त्याने आतून प्रचंड खुश झाला असूनही भावना आवरून दिलेली उत्तरे. तिनेदेखील सगळे कळत असून वळत नाही असा आणलेला आव. मस्तच. कॅम्पला जाणे. शाळेत कॅम्पला जायला मिळते म्हणून प्रत्येकजण स्काऊटला जातो. आणि त्यात एनसीसीसारखी कटकटदेखील नसते. चित्र्या आणि जोशा दोघे तिथे धम्माल करतात. चित्र्या शेकोटीसमोर ‘प्रगती आहे’ असे जोशीला ज्या अंदाजाने म्हणतो ते बघण्यासारखे आहे. ह्यानंतर जोशीला आलेला धीर. आणि त्याने तिला ‘विचारणे’! त्याचे ते कपडे…तिला ‘इम्प्रेस’ करायला..आणि मग मधली सुट्टी होते.

मूळ पुस्तकाएवढा नसेल पण चित्रपट नितांतसुंदर आहे! एकदा पहाच...

मग त्यांचा ‘प्रवास’ सुरु होतो. त्याची आणि बिबीकरची मारामारी. सुऱ्याने बिबीकरला दिलेले फटके. का तर जोशी आपला मित्र आहे. त्याच्या नादाला तू लागायचे नाही. आठवा शाळेतला कुणीतरी मित्र जो असतो म्हणून आपण शाळेत कधीच कुणाच्या बापाला घाबरत नाही. शिरोडकरने घरी ये म्हटल्यावर ’तुला माझे घर माहिती आहे का?’ असे विचारले की लगेच ‘मला माहीत आहे तुझे घर’ असे सांगताना जोशीचा खुललेला चेहरा. तिच्या घरी जाताना जोशी कुठले शर्ट घालायचे हे ठरवत असतो. ते करत असताना ‘गंगू कुठे गेली?’ हे गाणे म्हणत असतो. मराठी माध्यमात शिकलेल्या कुठल्याही पोराला हे गाणे चांगलेच माहीत आहे. त्याची बहिण उर्फ अंबाबाई आली की जोशी लगेच ‘हम होंगे कामयाब’ गाणे गुणगुणत राहतो. हा छोटासा प्रसंग जबरदस्त चितारला गेलाय. एका प्रसंगात मांजरेकर सर आणि आंबेकरचे काय लफडे असे सुऱ्याने विचारल्यावर फावड्या त्याच्या गालावर चापट मारून ‘तुला काय करायचे आहे?’ असे म्हणून पळत सुटतो. सुऱ्यादेखील त्याच्या मागे पळत सुटतो. त्यावेळचे पार्श्वसंगीत अफलातून. एकतर प्रेम म्हणजे काय हे माहीत नसताना जोशीने शिरोडकरला विचारणे ‘मग आपण पुढे काय करायचे’ हा संवाद पोट धरून हसवतो. चेसमध्ये भाग घ्यायला तिने खुणावणे आणि याने भाग घेणे. सुऱ्या प्रत्येक पोराच्या मनातले असलेले स्वप्न बोलून दाखवतो. ‘आपले स्वप्न माहिती आहे ना काय आहे ते. पोरं विरुद्ध पोरी अशी कबड्डीची मॅच लावायची.’ आणि म्हणता म्हणता जोशीची पप्पी घेतो. असा कुणीतरी ‘अधीर’ शाळेत भेटतोच. मध्यंतरानंतरचा प्रवास थोडा वेगवान आहे. आणि मग तो पुस्तकाप्रमाणेच गंभीर होतो. केटीला अटक होते. केवडाला ‘ए लाईन देते का?’ असे विचारल्यावर मिळालेला नकार. मग अंदाजाप्रमाणे चित्रपट शेवटाकडे झुकायला लागतो. मुख्याध्यापक सुऱ्या आणि जोशीच्या पालकांना बोलावतात. जेव्हा जोशी घरी शाळेतून दिलेले पत्र घरी घेऊन जातो तेव्हा त्याच्या अपेक्षेप्रमाणे आई आणि अंबाबाई थयथयाट करतात. पण त्याला खात्री असते की बाबा ते समजावून घेतील. त्याला बाबा जेव्हा विचारतात की काय झाले तेव्हा तो सगळे सांगतो. ‘प्रेम करतेस का?’ हे ऐकल्यावर जोशीच्या बाबांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटते. तो मुद्राभिनय मस्त आहे. ‘तुम्हाला प्रेम म्हणजे काय कळते तरी का?’ असे आई ओरडताना जोशी मान खाली घालून हसत असतो. आठवा पाहू. आई किंवा बाबा किंवा कुणीही वडिलधारी माणूस ओरडताना निर्लज्जपणे मनसोक्त हसायला येतेच. जोशी ते हुबेहूब वठवतो. रात्री आई-बाबा-अंबाबाई यांचा संवाद ऐकताना आपले बाबा आपली बाजू घेताना ऐकून तो खुशीत झोपतो. सगळी लफडी सुटतात. जोशी अभ्यासाला लागतो. या नंतरचा सगळा प्रवास हा फ्रेममधूनच आहे. फ्रेम डोळ्यासमोर येत राहतात. अजिबात संवाद नाहीत. सगळे संपता संपता चित्र्या सांगतो,’आता शाळा सुटणार!’ रिझल्ट लागतो आणि जोशीला कळते की शिरोडकरच्या बाबांची बदली झालीय. फावड्या आणि सुऱ्या नापास झालेत. तो त्याच्या आवडत्या तलावावर जातो आणि एकटाच बडबडतो. ‘आता उरले आहे फक्त दहावीचे भयाण वर्ष!’ चित्रपट संपतो. आपणही गंभीर होतो. दहावीचे बोजड वाटणारे वर्ष आणि धम्माल केलेले नववीचे वर्ष आपल्याला आठवते.

कलाकारांमध्ये सगळ्यांची कामे झकासच. जोशी-शिरोडकर जोडी भन्नाट. पण मला खास आवडले ते जोशीचा बाप (नंदू माधव) आणि नरूमामा (जितेंद्र जोशी). जितेंद्र जोशी आणि मांजरेकर सर (संतोष जुवेकर) यांची केशभूषा पाहिले की यांच्या ‘केसात’ नक्कीच उवा झाल्या असतील असे वाटते. असो. ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांना लगेच आठवते की यात काही गोष्टी नाहीत. कथेचा नायक जोशी असल्याने त्याच्याभोवतीच चित्रपटातील सगळे कथानक गुंफलेले आहे. आणि ती तशी गरजच आहे. त्यामुळे पुस्तक जेवढे सुंदर आहे तेवढा चित्रपट नाही. पण तरीही तो सुंदरच आहे. थोडे मागे पुढे. दिग्दर्शकाने ‘लिबर्टी’ घेतलीय जी समर्पक आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम देखणी आहे. ती आपल्याशी थेट बोलते. त्यासाठी संवादाची गरज लागतच नाही. आणि हा अनावश्यक भाग टाळल्याने चित्रपट अधिक परिणामकारक वाटतो, थेट भिडतो. या जोडीला ७५ चा काळ आहे. अदभूत अशी रंगसंगती या चित्रपटात आहे. ती डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडते. आपल्या आणि परकीयांच्या दृष्टीकोनात नक्की काय फरक आहे हे उमगते. कारण चित्रपटाचा छायालेखक दिएगो स्पॅनिश आहे. हा बेटा प्रत्येक फ्रेममधून आपल्याला वेगळेच जग दाखवतो. शाळेतले वर्ग, तलाव, देऊळ आणि बरेच काही अगदी मन मोहून टाकते. तीच गोष्ट पार्श्वसंगीताची. ते दिले आहे अलोकनंदा दासगुप्ताने. संवादाची गरजच नसावी एवढे कमालीचे परिणामकारक पार्श्वसंगीत आहे. माझ्या मते पार्श्वसंगीतकार आणि छायालेखक या दोघांना या चित्रपटाचे सुजय डहाकेसोबतचे दिग्दर्शक म्हटले पाहिजे. मला नेहमीच वाटते की चित्रपट कळायला ती भाषा माहीत असणे मुळीच गरजेचे नसते. त्याची साक्ष ह्या दोघांच्या अप्रतिम कामाने मिळते. माझ्या मते ‘पांगिरा’ आणि ‘शाळा’ हे कादंबरीवर निर्माण केलेल्या चित्रपटांपैकी सर्वोत्तम मानता येतील. चित्रपटांच्या फ्रेममधून चित्रपट समजून घेणारा काही सुजाण प्रेक्षकवर्ग या चित्रपटाने निर्माण केला आणि हा चित्रपट पाहिल्यावर ज्यांनी वाचले नाही अशांनी ‘शाळा’ पुस्तक वाचून थोडीशी का होईना वाचनसंस्कृती पुनरुज्जीवित केली तरी हा चित्रपट प्रचंड यशस्वी होईल असे मी मानतो. याची तीन गाणी सुजयने रिलीज केलीत जी चित्रपटात नाहीत पण अप्रतिम आहेत. ही गाणी आहेत बहने दो, सदा१, सदा२.

महत्वाचे म्हणजे येणार येणार असे म्हणता म्हणता तब्बल वर्षभराने हा चित्रपट आलाय. या दरम्यान चित्रपट कधी येणार यावरून ‘शाळा’च्या फेसबुक पेजवर दिग्दर्शक सुजय डहाकेशी काही मित्रांची आणि माझी खडाखडी झाली होती. (‘शाळा’च्या फेसबुक पेजला मिळालेल्या जवळपास ११,००० ‘लाईक्स’ ह्या आतापर्यंत कुठल्याही मराठी चित्रपटाला मिळाल्या नसतील.) त्याच्या मते वितरक मिळत नसल्याने एवढा वेळ लागला. पण ज्यांनी कुणी ह्या चित्रपटाचे आधीचे दोन प्रोमो पाहिले असतील त्यांचा यावर विश्वास बसणार नाही. महेश मांजरेकर म्हणतो की सचिन खेडेकरने सांगितले म्हणून मी या चित्रपटाचे प्रोमो पाहिले आणि मग ठरवले की आपण यात उतरायचे. खरेतर याचे प्रोमो इंटरनेटवर बरेच दिवस धुमाकूळ घालत होते आणि तरीही चित्रपटसृष्टीतील ‘मान्यवर’ लोकांना वर्षभर ते माहीत नसावे याची खंत वाटते. गेल्या काही वर्षात आलेला हा उत्तम चित्रपट आहे आणि मांजरेकरच्या अलीकडच्या चित्रपटांचा दर्जा पाहिला असे म्हटले तर मांजरेकरने लोण्याचा गोळा मटकावलाय असे म्हणता येईल. मराठीतल्या एका सर्वोत्तम कादंबरीवर कुणीतरी डहाके आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती दोन परदेशी तंत्रज्ञांना साथीला घेऊन बनवतोय याची माहिती बाकी सोडा पण मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकांनादेखील नसते (महेश मांजरेकरला जर भाताचे शित म्हटले तर शितावरून भाताची परीक्षा करता येते.) यावरून मराठी चित्रपटाची ही दशा का आहे याचे उत्तर मिळते असे म्हटल्यास वावगे ठरेल काय?

अविनाश.

(महत्त्वाचे: २६ जानेवारीला ‘जन गण मन’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. आपला मैतर अमित अभ्यंकर याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. लेखक समीर जोशीदेखील मित्र आहे. नंदू माधवने यात शिक्षणसेवकाची भूमिका केलेली आहे. हा चित्रपट मी आधीच पाहिलेला आहे आणि मस्त बनवलेला आहे. त्यामुळे ‘चिकनी चमेली’ कितीही हॉट असली तरीही २६ जानेवारीला ‘जन गण मन’ म्हटलेच पाहिजे. याचा प्रोमो इथे पहा.)

Comments
 1. vaibhav

  jabrdast avi……..

  aata aalya var ha cinema pahavach lagna aahe…. mast varrnan kele aahes 10/D che divas aathvale…..

  khup chan, surekh, apratim….

 2. Vaibhav Gaikwad

  शाळा पुस्तक इतके सुंदर आणि narrative आहे की त्यावर चित्रपट बनवणाऱ्याला jackpot guranteed आहे. अर्थात हिंदीत बनवणाऱ्याने तिकडे पण माती खाल्ली म्हणा. पण तरीही कादंबरीवरून बनवलेल्या चित्रपटाबद्दल म्हणायचे तर मराठीतच नव्हे तर अवघ्या जगभरात मी ‘सिंहासन’चे नाव घेईन.
  ता.क. सुजयशी वाद झाला तो चित्रपट प्रकाशित होत नाही म्हणून नव्हे, तर पेज hack कसे झाले त्यावरून. पण त्याचे आता इतके काही नाही. चित्रपट चांगला आहे ना? मग सुजयला काय चाटायचाय?

 3. Bhari ho.

  Very good review. But cannot see the movie right now. :(.

 4. Parag Chaudhari

  ” …किंबहुना हे ज्याने केलेले नसते तो शाळेत गेलेलाच नसतो” —-> very true

  ” प्रेम म्हणजे काय हे माहीत नसताना जोशीने शिरोडकरला विचारणे…” —-> i will say, किंबहुना पहिल्या प्रेमाचा अतुलनीय अनुभव आणि ते तसेच टिकून राहावे याबद्दलची आगतिकता यातून निर्माण झालेला वरवर बिंडोक दिसणारा परंतु भावनाविवश प्रश्न !

 5. छान लिहीला आहे लेख…! अगदी योग्य आणि समर्पक! :)

 6. अति उत्सुकतेने ज्याची वाट पाहिली तो रिलीज झाला एकदाचा…
  आमचा ब्लॉग ही नक्की वाचा…शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही
  http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2012/01/blog-post_23.html

 7. sudhir khodwekar

  सर खुप मस्त लिहला आहे आणी पुस्तक तर लयच भारी…पिक्चर मी पण बघणार आहेच!
  च्या मारी सर खर सांगायच तर
  मला पुस्तक वाचता वाचता जाम वाईट वाटत होत…..असा वाटत होत की साला अपन शिकलेली शाला अशी होती काय?
  तर ती होती पण मी सुम मधे असायचो अर्थात ऑफ पिरेड आणी पीटी जाम आवडायच….. आम्ही पण नववीलाच कैंप ला गेलो धम्माल तर केलीच पण मारामारी पण केली….पण मी सुरया सारख्या पोरापासून लांब असायचो ….आमचा शांत पोरांचा ग्रुप होता. पोरीं कड़े बघायचो….पण कोणाच्या छात्या बघितलेल्या आठवत नाही…मी पण एकदा जरा जास्त शहान पणा केला म्हणून वर्गाच्या बाहेर होतो तेव्हा असाच डोंगरा कड़े बघत होतो आमच्या शाले बाहेर पण छान मैदान आणी डोंगर आहे..वाचताना खुप धम्माल आली ….पण शेवट एवढा वाईट आहे की माझी शाला संपली तेव्हा ही एवढे वाईट वाटले नव्हते…

 8. sanjay dubi

  khup chan, surekh

 9. NICE POST IT WAS!!!!!!!!!!!!!
  HEART TOUCHING, MESSAGE, AND EVERYONE SHOULD WATCH THIS MOVIE.
  I’V SEEN THIS ABOUT 12 TIMES……….

ADD YOUR COMMENT