‘क्ष’!

नमस्कार,

बहुतेक रविवार असावा. नाही रविवारच होता कारण मी जीन्स-शर्ट अशा पेहरावात होतो. काहीतरी टाईमपास करत होतो. कुणीतरी जुना विद्यार्थी ऑनलाईन भेटला असावा. असे जुने विद्यार्थी भेटले की मस्त मजा येते. जुन्या आठवणींना उमाळा फुटतो. ‘सर, आठवते आपण काय धम्माल केली होती ते!’ असे वाक्य तर खुपच वेळा असते. मीसुद्धा ‘नोस्टॅल्जिया’मध्ये जातो. कधी कधी वाटते की च्यामारी कशाला हे सगळे भेटतात आणि त्या धम्माल गोष्टींची आठवण करून देतात. कारण दोघेही आता लांब असतो. पण खरेतर दोघांनाही ते मंतरलेले दिवस आठवत असतात आणि त्या आठवणीत आम्ही दोघे हरवून जात असतो. असे नेहमी होते ते रविवारीच! कारण तेव्हा मला बराच मोकळा वेळ असतो. त्यादिवशी ऑफिसला लवकर आलेलो. त्यामुळे तसा शुकशुकाटच होता. साधारण सव्वा दहा वाजले असतील. आवाज आला. ‘मे आय कम इन सर?’ खरेतर एवढ्या सकाळी कुणी आला तर शॉट लागतो. पण समोरचा उगीच सकाळी सकाळी मला भेटायला कशाला येईल, काहीतरी महत्वाचे असेल असा मी साधारण विचार करतो आणि त्याला ‘कम इन’ असे सांगतो. एक स्मार्ट दिसणारा उमदा पोरगा आत येतो. मी त्याला विचारतो, ‘काय काम आहे?’ तो म्हणतो, ‘सर, थोडी चौकशी करायची आहे.’ त्याचा एकंदरीत पेहराव म्हणजे लालगा टी-शर्ट आणि लांडी (सभ्य (?) भाषेत थ्री फोर्थ) चड्डी! मी त्याला एक फॉर्म भरायला दिला. त्याने जमेल तसा भरला आणि दिला. आता त्याने तो पूर्ण भरलाच नाही. मी वैतागलो. त्याला बोललो,’नक्की अमेरिकेला जायचे आहे की युकेला? कारण युकेला जायला एवढेच भरावे आणि करावे लागते.’ त्याने माझ्याकडे एक तिरका कटाक्ष टाकला. बहुधा त्याला एवढ्या तिखट भाषेत कुणीच, कधीच बोलले नसावे. त्याने इज्जतमध्ये सगळा फॉर्म भरून दिला. मी बोललो, ‘हुशार आणि स्मार्ट तर आहेस. निदान वाटतोस तरी. मग नीट फॉर्म आधीच भरायचा ना!’ त्याने एक जीवावर आल्यासारखी चोरटी स्माईल दिली. कोणत्या मुर्खासमोर आपण बसलोय असा त्याचा एकंदर आविर्भाव होता. विशीतला असावा. कारण स्वभाव बंडखोर दिसत होता. तेव्हा बाकी सगळे यडझवे आहेत असे वाटत असते. तसाच तोही वाटला. त्याचा फॉर्म पाहिला. दहावीला ८६% आणि बारावीला ४६%! त्याच्याकडे पुन्हा पाहिले. त्याने नजरेला नजर भिडवली नाहीच. त्याला बहुतेक लाज वाटली असावी. अर्थात मार्क्स जास्त असल्याने पोरगा हुशार असतो असे मला कधीच वाटले नाही. पण म्हणतात ना…’पैसा खुदा तो नही लेकिन खुदासे कम भी तो नही’ असाच काहीसा प्रकार मार्कांबाबत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मी त्याला विचारले, ‘बोल, कसली चौकशी करायची आहे?’ त्याने कसलेही आढेवेढे न घेता मला सांगितले की, ‘मला इथे शिकायची इच्छा नाही. मला बाहेर जायचे आहे.’ मी त्याला विचारले, ‘म्हणजे नक्की काय?’ त्याने सांगितले, ‘सर, इकडे मी ‘तसा’ हुशार होतो दहावीपर्यंत. पण नंतर मग कॉलेजला गेल्यावर क्लास आणि कॉलेज या दोन्ही रगाड्यात फसलो आणि अभ्यासावरून लक्ष उडाले. दहावीपर्यंत शाळेतले शिक्षक छान शिकवायचे आणि समजावून सांगायचे. पण कॉलेजमध्ये मात्र मला चांगल्या मार्काने पास करायचा एवढाच त्यांचा उद्योग होता. मला काही समजते का नाही याचा कुणी विचारच केला नाही. आणि मला एखादा प्रॉब्लेम सोडवता आला याचा अर्थ मला ती कन्सेप्ट कळाली असा थोडीच होतो.’ त्याची बंडखोरी आता मला समर्थनीय वाटू लागली होती. ‘मग मी काही प्रश्न विचारले की हे तर परीक्षेला येत नाही ना, कशाला एवढा विचार करतोस? अशी उत्तरे मिळाली. मी अभ्यास नाही केला आणि जाऊन बारावी दिली. जे काय मार्क आहेत ते मिळाले.’ मी विचारले,’ तू आता वीस वर्षाचा आहेस. मध्ये २ वर्षे काय केलेस?’ ‘सर, काय करता येईल याचाच विचार करत होतो. प्रवेश घेतला होता बीएससीला. कारण तिथे माझी गर्लफ्रेंड होती.’ मला त्याच्या प्रेमप्रकरणामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी मुद्द्यावर बोलू लागलो. ‘याची ग्यारंटी काय की अमेरिकेला जाऊन तू अभ्यास करशील?’ ‘२ वर्षे काही केलेच नाही. जग खूप पुढे चाललंय. मी इथेच आहे. आता काहीतरी करायचे आहे.’ ‘ठीक आहे, आता जून महिना आहे. तुला लवकरात लवकर परीक्षेची तयारी करावी लागेल तरच जानेवारीला अमेरिकेत पोचशील. नंतर बाबा किंवा आईला घेऊन ये. मला त्यांच्याशीदेखील बोलावे लागेल.’

आठवडा निघून गेला. नंतर त्याचे बाबा आले. बोलता बोलता कळाले की ते एका मोठ्या परदेशी कंपनीत व्हीपी आहेत. आईदेखील एका प्रसिध्द सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. त्याचे बाबा मला आधीपासूनच ओळखत होते. कारण त्यांच्या एका सहकाऱ्याचा मुलगा माझ्याकडे होता. त्यांनी सांगितले,’सर, माझा मुलगा गेली दोन वर्षे काहीही करत नव्हता. त्याला आता स्वत:हून काहीतरी करावेसे वाटते यातच मी खुश आहे. त्याला कित्येकदा मी समजावला पण तो काही ऐकायला तयार नव्हता. पण आता त्याची गाडी रुळावर आलीय असे वाटायला लागले आहे. जरा तुम्ही मार्गदर्शन करा.’ मी त्यांना हो बोललो आणि मग त्यांना सांगितले,’त्याला उद्यापासून पाठवून द्या. मी बघतो काय करायचे ते!’ त्यानंतर बरेच दिवस झाले. बहुधा पंधरा दिवसाने त्याची आई मला भेटायला आली. मला म्हणाली, ‘त्याचा सध्या मूड नाहीय. तो नंतर प्रवेश घेईल.’ मी म्हणालो, ‘मला काय फरक पडतोय. त्याची दोन वर्षे वाया गेलीत. त्याला खरेच रुळावर यायचे असेल तर त्याने यावे.’ ‘पण त्याच्या मनाविरुध्द काही होता कामा नये असे मला वाटते.’ त्याची आई म्हणाली. मी थोडा वैतागलो. ‘हे बघा, त्याला वाटले म्हणून तो माझ्याकडे आला. त्याने काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मी त्याला दिली. त्याला माझ्याकडे यायचे आहे की नाही हा त्याचा आणि तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला वाटते की तो अमेरिकेला जाऊन काहीतरी करू शकेल. कारण इकडे शिकण्याची त्याने आशा सोडली आहे. मी हेच त्यालाही सांगिले, त्याच्या बाबांनाही सांगितले आणि तुम्हालाही सांगतोय. आणि यात कुठे मी कुणाला जबरदस्ती करतोय हो. जर त्याला अजून चांगला पर्याय मिळत असेल तर त्याने जरूर ते करावे. मी माझ्यातर्फे प्रामाणिक सल्ला दिलाय. त्याची केस जरा वेगळी आहे आणि त्याचे भले व्हावे असे मला वाटते. बाकी तुमची मर्जी!’ त्याची आई काही न बोलता निघून गेली. मला ती मुलाच्या अतिअधीन झालेली वाटली. त्यानंतर मी ४-५ दिवस रजेवर होतो. परत आल्यावर तो दिसला. मी किरणला (माझी सहकारी) विचारले,’हा आला काय?’ किरण म्हणाली, ‘अरे, तू त्यादिवशी त्याच्या आईला सुनावून गेलास. तिला काय वाटले काय माहीत! तू गेल्यावर रात्री ८ वाजता हा फी भरायला आला.’ मी तिला म्हटले, ‘त्याचे नशीब की त्याला कळाले की आपण त्याच्या भल्याचा विचार करतोय.’

एकदा मला कळाले की हा बरेच दिवस झाले आला नाही. किरणने त्याला फोन केला तर तो म्हणाला की मी घरीच अभ्यास करतोय. त्याला मी भेटायला यायला सांगितले. तो आला. मी त्याला काही प्रश्न विचारले. त्याने बरोबर उत्तरे दिली. आता मला त्याचा असलेला ‘मूड’ घालवायचा नव्हता. म्हणून त्याला एवढेच म्हटले की मला येऊन दर तीन दिवसांनी भेटायचे आणि तू नक्की काय काय केलेस ते मला सांगायचे. तो नियमितपणे भेटायचा. मला माहीत होते की याला गरज ट्रेनिंगची नाही तर मोटिवेशनची आहे. ते मी त्याला देत होतो. त्याचा स्कोर काय येतो यापेक्षा तो परीक्षेला जातोय ना हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे होते. यथावकाश त्याने परीक्षा दिल्या आणि बऱ्यापैकी गुण मिळवले. प्रवेश मिळवण्यासाठी काही कागदपत्रे अमेरिकेला विद्यापीठांमध्ये पाठवायची असतात. त्याची जमवाजमव सुरु झाली. त्यात तो दिरंगाई करू लागला. मला एकदा किरणने सांगितले की, ‘अरे तो टंगळमंगळ करतोय.’ मी भडकलो कारण विद्यापीठांच्या डेडलाईन असतात. त्यानंतर कागदपत्रे पाठवली तर घंटा काही फायदा नसतो. मी त्याच्या आईवडिलांना बोलावून घेतले. त्याचे वडील दिल्लीला असतात हे मला तेव्हा कळाले. इकडे सगळा कारभार आईकडे होता. त्याचे आईचे एकच पालुपद. ’त्याचा मूड नव्हता. म्हणून तो काहीच करत नव्हता.’ मी त्याच्या आईला तास-तास तासला. दोघांना बोललो, ‘तुम्हाला कसे कळत नाही की सगळ्या गोष्टी वेळेवरच झाल्या पाहिजेत. आमची फी भरली म्हणजे काय अमेरिकेला पोचला का?’ त्याची आई शांत होती. त्याच्या बाबांनी तिला माझ्यासमोरच झापले कारण सगळे अगदी वेळेवर चालले आहे असे त्यांना कळवले जात होते. अर्थात मला यात काहीही इंटरेस्ट नव्हता. मला त्याच्या कामाशी मतलब होता. या आठवड्यात सगळे पूर्ण करू असे सांगून ते दोघे गेले.

संध्याकाळी त्याचे बाबा मला वेगळे भेटायला आले. मी कामात होतो. मी त्यांना म्हटले, ‘अहो एक फोन करून यायचे ना! खुपजण आहेत माझ्याकडे. तुम्हाला वेळ दिली असती.’ ते म्हटले,’सर, तुमचे चालू दे. मला बराच वेळ आहे. तुमचे झाले की भेटू आपण.’ ते जवळपास दोन तास बसले होते. काहीतरी गंभीर असावे असावे असा विचार करून मी शेवटच्या दोनजणांना जरा लवकर आटपले. आणि त्यांना आत बोलावले. रात्रीचे दहा वाजले होते. आम्ही दोघेच होतो. ते मला म्हटले, ‘सर, तुम्ही आज खूप छान केलेत. माझ्या बायकोला झापले ते. कारण तिला काही गोष्टी अजून कळतच नाहीत. दू:ख असते हे ठीक आहे पण किती दिवस ते उगाळत बसायचे.’ ‘समजले नाही. कुठल्या दुखा:बद्दल तुम्ही बोलताय?’ माझा प्रश्न. ते सुरु झाले. ‘सर, ‘क्ष’ आमचा दुसरा मुलगा. आमचा पहिला मुलगा सतेज. तो अपघातात वारला. त्याला आम्ही त्याच्या मनाविरुध्द समर कॅम्पला पाठवला होता. याचे दू:ख त्याच्या आईला अजूनही सलते. त्याच्या आईचीच इच्छा होती की तो कॅम्पला गेला की घरी बसण्यापेक्षा काहीतरी शिकेल. त्याला आमच्यासोबत राहायचे होते. पण ही ऐकलीच नाही. तो गेल्यावर २ वर्षाने ‘क्ष’ झालाय. आमचे वय बघा. मुलाचे वय बघा. मी साठीला पोचतो आहे. पहिला मुलगा वारला म्हणून आम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न केले. म्हणून आई एवढी अशी आहे. त्याने जरा जरी काही सांगितले तर ही त्याची बाजू घेते. मीसुद्धा पहिल्या प्रसंगाने हळवा झालो असल्याने जास्त काही बोलत नाही. पण तुमच्या रुपाने मला कुणीतरी भेटले जे माझ्या मुलाला त्याच्या भल्यासाठी भलेबुरे सुनवेल.‘ मी निस्तब्ध झालो. मला भरून आले. पण मी माझ्या भावना आवरल्या. कारण मीच जर ढेपाळलो असतो तर यांच्याकडून काम करून घेऊ शकलो नसतो. मी बोललो, ‘सगळे पालक माझ्याशी त्यांचे सगळेच प्रॉब्लेम डिस्कस करतात. तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली. आणि तुमच्या बायकोला भेटल्यावर मला वाटलेच की समथिंग इज राँग विथ योर वाईफ? बरे ठीक आहे. पण या सगळ्याने आहे ती परिस्थिती तर बदलत नाही ना. आपल्याला कामे वेळेवरच केली पाहिजेत.’ त्यांनी मान डोलावली. आणि लवकरात लवकर कागदपत्रे पाठवून दिली.

त्याला दोन-तीन ठिकाणी प्रवेश मिळाला. त्याचा व्हिसा झाला त्यादिवशी त्याच्या बाबांचा कॉल आला. त्यांनी सांगितले, ‘तो तुमच्याशी फोनवर बोलू इच्छित नाही. तो तुम्हाला भेटायलाच येईल.’ २-३ दिवसांनी तो मला भेटायला आला. खुश होता. एवढा खुश त्याला कधी पाहिला नव्हता. माझ्याशी भरभरून बोलला. जाताना म्हटला, ‘सर, आईस्क्रीम खाता काय?’ मी त्याला नाही बोललो. आणि मला खरेच आईस्क्रीम आवडत नाही. पण मी त्याच्यासाठी अपवाद करू शकलो असतो. एका आईस्क्रीमने माझा जीव तरी नक्कीच गेला नसता. पण मला त्याच्यापासून एक अंतर ठेवायचे होते. कारण त्याला मी जर मित्रासारखा वागवलं असते (जसे माझे संबंध बाकी विद्यार्थ्यांसोबत आहेत!) तर त्याने पुढे माझे अजिबात ऐकले नसते अशी माझी खात्री होती. आणि मला ते करायचे नव्हते. म्हणून मी ते नाकारले. (मला आज मात्र वाटते की मी ‘ते’ आईस्क्रीम स्वीकारायला हवे होते!) मी त्याला मिठी मारली आणि ‘तू अमेरिकेला चालला आहेस हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे’ असे म्हटले. मी आईस्क्रीम न स्वीकारल्याने त्याने त्याच्या बाबांजवळ आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली. अर्थात तो माझ्याबद्दल काय विचार करतो याच्याशी मला काही घेणेदेणे नव्हते. त्याच्या बाबांनी मला फोन करून सगळे सांगितले. मी त्यांना माझा विचार सांगितला आणि त्यांना तो पटला. पुढे अमेरिकेला जायच्या आधी त्याने मला फोन केला आणि धन्यवाद म्हटले. आता एक ‘चाप्टर’ माझ्यासाठी तात्पुरता संपला होता. तो गेल्यावर मग त्याचे आईबाबा पुन्हा एकदा भेटून गेले आणि आभार मानून गेले. अर्थात याची गरजच नव्हती कारण मीच स्वत:वर खुश होतो. कुणाला तरी मार्गाला लावला. माझ्यासाठी याच्यापेक्षा मोठे सुख कुठलेच नाही.

बरे हे सगळे का आठवले? कारण तो भारतात आला होता. मला भेटला आणि त्याची जोरात प्रगती सुरु आहे असे कळाले. त्याचे संपूर्ण कुटुंब स्वित्झर्लंडला गेले होते आणि मग तिथे त्याच्या एका चुलतभावाने त्याला कशावरून तरी भलेबुरे सुनावले. मग त्यानेही त्याला खूप सुनावला. मग बाबांना म्हटला. ‘मला एवढे सुनवायचा हक्क फक्त आणि फक्त अविनाश सरांना आहे. कारण त्यांनी नेहमीच माझ्या भल्याचा विचार केलाय.’ रात्री ते सगळे झोपल्यावर त्याच्या बाबांनी मला तिथून फोन केला आणि बोलले, ‘सर, एका वर्षानंतर का होईना त्याला पटले की तुम्ही फक्त त्याच्या भल्यासाठी बोलत होतात. तुम्ही जिंकलात!’ आणि फोनवरूनच रडू लागले. माझ्याही डोळ्यात पाणी आले. खरेतर माहीत नाही कोण जिंकले पण नक्कीच त्याचे ‘आयुष्य’ जिंकले. आणि आयुष्य जिंकले तरच माणूस जिंकतो आणि त्याच्या सभोवतालचे जगदेखील!

अविनाश.

Comments
 1. Saurabh

  वाह वाह!!! भारीच…

 2. छानच! एक वेगळा अनुभव! ‘जग दर्शन का मेला’ हे वेगळ्या अर्थाने वाटले! :)

 3. SUDARSHAN NAIK

  KEEP ON…..

 4. मुळात, आपण एखाद्या व्यक्तीला मानतो, तिचा आदर्श ठेवतो किंवा आदरपूर्वक काही अधिकार बहाल करतो हे कबूल करणेच आजकाल बंद झाले आहे. मी एखाद्याला admire करतो, म्हणजे काही मोठं पाप नाही करत. उलट ज्याच्याकडे पाहून काही शिकावं असे लोकंच ज्या समाजात फार काही उरले आहेत, त्यांत निदान माझी परिस्थिती तरी तशी नाही आहे, इतका विचार जरी मुलांनी केला तर त्यात त्यांचाच फायदा आहे.
  लेख छान, एरवी तुमच्या लेखाला काय comment करावी ते कळत नाही, इतके speechless करून जातात ते लेख. पण या विषयावर बोलल्याशिवाय राहविले नाही…

 5. Akshay

  khup chaan!!!

 6. prakash pimpalke

  speechless aahe ha blog sirjee

 7. vaibhav

  nice blog avi…..

 8. Tejas

  Surekh!

 9. Harshavardhan

  कडक !!!!!

 10. Rahul Khadse

  सर तुम्ही सूर्यासारखे आहात ,
  स्वतः जळून दुसर्यांना प्रकाश देणारे !
  तुम्ही जे काही माझ्या साठी केले,
  तुम्ही जो काही बदल माझ्या जीवनात केलात

  त्या साठी मी तुमचा आभारी आहे !

 11. Gaurav Ranade

  Baryach aai vadilansathi ani vidyarthyansathi vachnyasarkha ahe lekh. Touching!

 12. Vijay Mhaskar

  Awesome Sir…………..!!!!!!!!!!!!!!!

ADD YOUR COMMENT