एक मैत्री – साठवून ठेवलेली!

नमस्कार,
यूडीसीटीमध्ये असताना मुलुंडवरून ट्रेन पकडायचो. ठाण्याला सकाळी मरणाची गर्दी असायची. त्यामुळे काही मित्र मिळून मुलुंडला ट्रेन पकडायचो. दोन्ही स्टेशन मला जवळच होती. त्यामुळे फारसा काही फरक पडायचा नाही. बहुतेक ७:३१ ची लोकल आम्ही पकडायचो. बरोबर ८:२५ पर्यंत आम्ही कॉलेजमध्ये पोचायचो. सुरुवातीला सगळे लेक्चर अटेंड करायची खाज असते तशी मलाही होतीच. ती नंतर हळूहळू उतरायला लागली. मग कधी लेट गेलो की एक चेहरा हमखास दिसायचा. ९:२७ ची ट्रेन होती. तो माणूस शांतपणे उभा राहत तंबाखू मळत उभा असायचा. पुढे पुढे पहिले लेक्चर बुडवायला सुरुवात केली आणि त्याच्याशी असलेली तोंडओळख मैत्रीत बदलली.
त्या माणसाचे नाव ताराचंद शहा! वय वर्षे (त्यावेळी असलेले) ७२…हो ७२…टायपिंग मिस्टेक नाहीय. आजोबांच्या वयाएवढा. संपूर्ण पांढरे केस आणि त्यावर नीळ दिलेला पांढराखड शर्ट-पँट. शर्टदेखील हाफच. असे बरेचसे म्हातारे फर्स्टक्लासमध्ये असतात. बहुतांश गुज्जुच आणि शेअर मार्केटशी संबंध असणारे. त्यातले बरेचसे विकृत असतात. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या शाळकरी  लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांना नको तिकडे हात लावतात. बघणाऱ्यांना  कळते पण कुणी काहीच बोलत नाही. त्यांना काहीच कसे वाटत नाही. मी दोन-तीनदा डोळे वटारले होते. तेव्हापासून माझ्यासमोर तरी असे काही घडले नाही. पण तारा यापेक्षा वेगळा होता. तंबाखू मळून झाली की बार तोंडात टाकून गुजरात समाचार वाचायचा. तो झाला की लोकसत्तादेखील वाचायचा. जास्त कुणाशी बोलायचा नाही. फक्त त्याच्या समवयस्कांना हाय वगैरे करायचा. पत्ते नाही खेळायचा की गुजरातीमध्ये केकाटून बोलायचा नाही. अर्धा गुजराती आणि अर्धा मराठी बोलता येईल असे तो एक अजब रसायन होता. त्याच्याशी तोंडओळख तर होती. पण बोलणे कसे सुरु झाले हे नक्की आठवत नाही. मागे एकदा त्यानेच मला सांगितले होते की तू आणि मी ‘व्हिडीओ कोच’मध्ये होतो तेव्हा लेडीज डब्यात राडा झाला होता. तेव्हापासून आपण बोलायला लागलो. बायका कशा मूर्ख असतात याच्यावर त्याने मला माटुंगा येईपर्यंत व्याख्यान दिले होते. नंतर ट्रेनमध्ये भेटलो की आम्ही बोलायचो. पहिल्यांदा नॉर्मल गोष्टी करता करता आम्ही दोघेही काय करतो यावर यायचो. ताराला मी अंकल कधीच बोललो नाही. त्याने मला एकदा विचारले की, ‘तू मला अरे तुरे करतोस हे मला आवडते. पण अंकल चुकूनसुद्धा कसा बोलला नाहीस.’ त्याला मी बोललो की, ‘तू माझा मित्र आहेस आणि मी कुठल्याही मित्राला अंकल म्हणत नाही.’ माझे मित्र मला जाम शिव्या घालायचे कारण मी ताराचंद शहा नावाच्या आजोबाला तारा या एकेरी नावाने हाक मारायचो म्हणून. मी त्यांना एकदा उडवून लावले होते. त्यांना बोललो, ‘आदर डोक्यात असावा लागतो तोंडात नाही.’ नंतर कुणी माझ्या वाटेला यावरून गेले नाही. असो.
ताराशी मैत्री जशी वाढत गेली तसे त्याच्याबद्दल मला कळत गेले. तो व्यापारी होता. काचेचा त्याचा मोठा व्यवसाय होता. त्याने तो विकला आणि स्वत:ला काही ठेवून बाकीचे पैसे मुलांत वाटून दिले. त्याच्या पोरांनी शेअर मार्केटची फर्म काढली होती. तारा एकदा म्हणाला की, ‘माझा माझ्या पोरांवर फारसा विश्वास नाही म्हणून मी या फर्मची मालकी माझ्याकडेच ठेवलीय. मी मेलो की त्यांनाच मिळणार आहे.’ मी त्याला विचारले की, ‘विश्वास का नाही?’ तर त्याने उत्तर दिले होते की, ‘शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणाऱ्यांना नातीगोती नसतात!’ हे मलातरी माहीत नव्हते. त्याचे वय लक्षात घेता तो चुकीचे बोलणार नाही याची खात्री होती. तारा तसा बराच चावट होता. साला म्हातारी दिसली की मला सांगायचा की हिला किती पोरे झाली असतील. यावर विश्लेषणही करून सांगायचा. त्याचे एकएक किस्से जबरदस्त असायचे. त्याने सहज सांगता सांगता त्याची लग्नानंतरची पहिली रात्र कशी गेली तेही सांगितले होते आणि खो-खो हसला होता. त्याचे बायकोवर निस्सीम प्रेम होते. त्याच्या बोलण्यावरून कळायचे. ती काही वर्षापूर्वी वारली होती. त्यानंतर त्याने लोकांमध्ये मिसळणे बंद केले होते. सकाळी उठायचे आणि सगळी कामे आटपून आपल्या फर्ममध्ये चक्कर मारून ट्रेनला गर्दी व्हायच्या आत घरी यायचे असा त्याचा दिनक्रम होता. त्याच्या वाढदिवसाला त्याने मला बोलावलं होते. त्याचे सगळे कवळीबहाद्दर मित्र होते आणि मी एकटाच लहान. बरे वाढदिवस ठेवला होता एका मित्राच्या फार्महाउसवर. तारा होता कट्टर जैन! निदान जगासाठी तरी. पण आता खूप झाला देवधर्म म्हणून थोडेफार चिकन वगैरे खायचा. व्हिस्कीचे पेग मारायचा. त्या सगळ्या म्हाताऱ्या तरुणांची पिकनिक हा माझ्यासाठी एक तजेला अनुभव होता. सगळेच लोक बिनधास्त होते. त्यातले बरेचसे जरा अतीच होते. तारासारखी ‘क्वालिटी’ त्या बऱ्याच जणांकडे नव्हती. मध्ये काही दिवस मी ताराला भेटलो नव्हतो. माझी परीक्षा होती. त्यामुळे ट्रेन पकडायची वेळ बदलली होती. तेव्हा ताराने मला फोन केला होता. परीक्षा आहे म्हटल्यावर मला घरी येऊन शुभेच्छा देऊन गेला होता. एकदा शेअर मार्केटमध्ये बरीच उलथापालथ झाली होती. तेव्हा मग डब्यातले सगळे गुज्जू टेन्शनमध्ये होते. तारा मात्र शांत होता. माझ्याशी नेहमीप्रमाणेच गप्पा मारत होता. त्याच्याशी एकजण भांडला की, ‘आपण इथे बरबाद झालोय आणि तू गप्पा कसल्या हाणतोयस.’ ताराने त्याला सांगितले की, ‘बाप तुमचा मेला असेल माझा नाही. माझा बाप एक माणूस होता. तुमचा बाप म्हणजे पैसा आहे.’ यावर तो गुज्जू गप्प झाला. ताराने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विजयी मुद्रेत हसला. ताराला हे असले मुखवटे मान्य नव्हते. तो म्हणायचा, ‘मी नावाला गुज्जू आहे. आयुष्यभर धंदा हवा तसा चालवला. प्रामाणिकपणे कर भरला. त्यामुळे मला बीपी नाही की मधुमेह नाही. या बाकी भडव्यांना बघ. रोज २ गोळ्या घरी खातात आणि १ गोळी व्हीटी स्टेशन आले की खातात.’ त्याचे तर्क हे त्याचेच होते.
एकदा मला फोन केला आणि बोलला, ‘मी चाललोय अहमदाबादला. येतोस का?’ मी फुकट होतो. त्यामुळे हो बोललो. हा पठ्ठ्या स्वत: गाडी चालवत मला अहमदाबादला घेऊन गेला. ड्रायव्हर मागे बसला होता आणि आम्ही दोघे पुढे. मलादेखील गाडी चालवू दिली नाही. ‘गांडू, बस ना गप्प. मी ठोकणार नाही कुठे. माझे ठोकायचे वय तरी उरलेय का?’ च्या मारी. डबल मिनिंग डायलॉग मारावे तर तारानेच! बरे ताराने मला का न्यावे अहमदाबादला हा प्रश्न मला पडलाच नव्हता. कारण कुणीतरी नॉनवेज खाणारा हवा असेल म्हणून मला नेला असेल असा माझा तर्क होता. पण तसे नव्हते. त्याने मला कुठल्याशा मुस्लीम वस्तीत नेले. तिथे जाऊन कबरीस्तानमध्ये गेलो. त्याच्या एका मित्राची कबर तिथे होती. त्याने फुले वाहिली आणि मला बोलला हा माझा एक सच्चा मित्र होता. त्यानंतर फार कमी मित्र भेटले. त्यात तुझाही नंबर लागतो. तिथून तो मला त्या मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथेच जवळपास राहत होता. त्याच्या घरी माहीत होतेच की आम्ही येणार आहोत. तिथेच आम्ही जेवलो. तिथल्या गप्पांच्या ओघात कळाले की ताराचा हा मित्र २० वर्षापूर्वीच वारला होता. त्यांच्या घरचा सगळा खर्च तारा उचलायचा. त्याची मुले आता धंद्यात जम बसवू लागली होती. तोदेखील तारानेच आपल्या ओळखी वापरून उघडून दिला होता. गुजरातच्या दंगलीत तारा ह्या सगळ्यांना मुंबईत घेऊन आला होता. आणि आपल्या घरी ठेवले होते. आता कुठे कळायला लागले की तारा या सगळ्या गुज्जू लोकांपासून अंतर ठेवून का असतो? परत येताना ताराने मला सांगितले की, ‘मी मुस्लीम लोकांना घरी ठेवले म्हणून आमच्या ‘सो कॉल्ड’ समाजाने मला वाळीत टाकले होते. मग मला माझा धंदादेखील विकावा लागला. तोही या लोकांनीच कमी किंमतीला विकत घेतला. माझी मुलेदेखील माझ्या विरोधात गेली. माझी बायको जी अगदी साधीसुधी होती तिला मुलांचे वागणे पसंत पडले नाही. त्यातच ती खंगत गेली आणि वारली.’ मी ऐकत होतो. ‘मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे धंदा काढून दिला. ते बऱ्यापैकी कमवायला लागल्यावर बाकी सगळे समाजवाले कसे सुतासारखे सरळ झाले आणि बहिष्कार मागे घेतला. मुलेदेखील समाजात राहायचे आहे या नावाखाली आमचा बाप चुकला. आम्हाला माफ करा असे बोलून समाजात मिसळून गेलेत. म्हणून त्यांच्यावर माझा विश्वास नाही.’ ताराने एका दमात सगळे सांगून टाकले. त्याच्याविषयीबद्दलचा आदर अजून वाढला होता. प्रवाहाविरुध्द पोहताना त्याने आपल्या मुलांचा बळी जाऊ दिला नव्हता. खरेतर त्याच्या मुलांशी माझे चांगले संबंध होते. हळूहळू कळायला लागले की हे मुखवटे तर बाहेरच्या जगासाठी आहेत.

२००९ मध्ये तारा आजारी पडला. काय झाले होते ते माहीत नाही. फोर्टिसमध्ये होता. त्याला भेटायला गेलो होतो. मला बोलला,’अवि, आता काय जगत नाही मी? बस झाले. खूप जगलो. आनंदात हवा तसा. मला वाटले तेच केले. अजून काय हवे?’ तब्बल १७ दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याने एक दिवस फोन केला आणि बोलला की, ‘भेटायला ये.’ मी गेलो तेव्हा तो कसलीतरी कागदपत्रे वाचत होता. मला बोलला, ‘मी काही आता अहमदाबादला जाऊ शकत नाही. ही कागदपत्रे कुरियर कर. माझ्या मुलांना काही सांगू नकोस.’ मी विचारले की, ‘काय आहे यात?’ तारा बोलला, ‘अहमदाबादजवळ एक छोटेसे मंदिर बांधले आहे. त्यात ट्रस्टी म्हणून माझ्या मुलांबरोबर तुझेपण नाव टाकलंय. वेळ मिळाला तर माझ्यासाठी म्हणून चक्कर मारत जा. तुझ्या बुद्धीला पटेल तेवढे कर.’ त्याने असे का केले हे काही कळाले नाही. त्यानंतर २ दिवसांनी तारा गेला. त्याच्या मुलाने फोन करून सांगितले. ताराचे मन राखण्यासाठी म्हणून त्या मंदिरात एकदा जाऊन आलो. तिथला गचाळपणा आणि ढोंगीपणा पाहून पुन्हा जायची इच्छा झाली नाही. अचानक मागे घरी एक पत्र आले. कारणे दाखवा नोटीस होती. त्यात लिहिले होते की तुम्ही मिटींगला वारंवार गैरहजर राहिल्याने तुम्हाला ट्रस्टीपदावरून का काढण्यात येऊ नये? मला उत्तर द्यायची इच्छा नव्हती. कुतूहल म्हणून मित्राला तिथे जाऊन यायला सांगितले. मला वाटले तेच झाले होते. एका प्रसिद्ध बाबाने जागा आणि मंदिर दोन्ही बळकावले होते. अर्थात ताराची मुले त्याच्या नादाला लागली होती. कारण त्यांना बराच तोटा झाला होता. असो. एवढ्या सगळ्या मित्रांच्या गडबडीत ताराची मैत्री साठवून ठेवलीय. त्यातले एकएक पान उलगडले की आनंद होतो.

कोण्या एका फ्रेन्डशिप डेला तारानेदेखील त्याचे नाव मार्करने माझ्या हातावर लिहिले होते आणि खो-खो हसला होता. ‘लई भारी बाप्पू’ असे त्याच्या टिपिकल स्टाईलमध्ये बोलला होता. आज सगळे फ्रेंडशिप डेला एसएमएस वाचताना त्याची प्रकर्षाने आठवण झाली इतकेच!

अविनाश.

(माझ्या महागाईवरील ब्लॉगचा उल्लेख ‘प्रहार‘ मध्ये झालाय. त्याबद्दल समीक्षा नेटके यांचे आभार!)

Comments
 1. Sudhir

  सर काय काय अनुभव आहेत तुमच्याकडे…..तुमच वय लपवता तुम्ही अशी शंका यायला लागली आहे आता !!!!
  असा गुज्जू पण निरालाच …..मस्तच फ्रेंड होता तुमचा …हैप्पी फ्रेंडशिप डे !!!!!

 2. Khupach chaan post aahe. Agadi dolyatun paani aale. Keep writing..

 3. sudarshan

  hi Avi,
  very nice wording of lines
  true speaking vachatana sagla anubhavlyasarkha vatat hota cos i had same experience like this
  gujjunchi changli marli aahe tyanchya typical swabhavachi

 4. Parag Shirsekar

  लई भारी बाप्पू!!!!

 5. Chaitanya Kulkarni

  Aaj punha ekda vachtana angavar kata ala. Kharach tumhi mhntla tasa ‘Kharya mansanchya goshti angavar kata ananarya astat’. Pan ajun ek goshta tumhi sangitli nahi. Ki tya goshti sangnara manus pan titkach saccha asava lagto. Tumcha pudhe natamstak vhavasa vatat….

 6. Viraj

  Awesome Blog Sir….Awesome mhanje Awesomach…..
  Salute..:)

 7. Preshit

  Avinash,
  Chaan lihile aahes. Keep it up
  Preshit

 8. तुमचे आत्तापर्यंतचे आयुष्य हे ‘लोकल ट्रेन’ सारखे आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांचा समावेश आणि त्यातून तितकेच वेगवेगळे अनुभव! :)

 9. Shakti

  72 varshacha Tara 7.2 Min parat jeevant jhala ani tey phakt tumhich karu shakta
  HAts offfff
  Simple TAra and Superb Avinash sir :)

 10. vaibhav telgote

  heart touchimg blog avi…..

 11. good to revisit such things in life, very well written

 12. Chetan Sakpal

  mast blog!!!
  aaj Avinash Veer blog reading day celebrate karto… :)

 13. Prithviraj

  आदर डोक्यात असावा लागतो तोंडात नाही.billion dollar line sir.

 14. Vikrant

  Fadoo Gugrati hota tuza yaar….

  nice web log .

 15. चांगलं लिहिलं आहेस….तारा खरंच भारी होता…नडला तो लोकांशी…हे सोप्पं नसतं…आणि बाकी बहुतांश लोक कायमच भंपकगिरी करत असतात.

 16. Tushar Narwade

  अपॄॄतिम..

 17. prasad

  Sakalpasun mood cha @$#&@&$ zala hota
  Mitrane ananya wali link send keli
  Mood set kela boss
  Kadakk..

 18. Dr Amol Yadav

  Apratim lihalay….

 19. SONALI DALWALE

  अवि मस्तच रे
  किती अनुभव आहेत तुज्याकडे ?
  तू ACTUALLY आयुष्य ”जगतोस”

 20. sambhaji

  Avi bhau @ changale vichar changali manse@

ADD YOUR COMMENT