आमचा सचिन”देव”…

नमस्कार,

आज २२ एप्रिल आहे (आणि परवा सचिनचा वाढदिवस!). तुम्हाला सचिनची ती खेळी आठवते का? २२ एप्रिल १९९८, कोकाकोला कप, शारजा! त्या सामन्यादरम्यान वाळूचे वादळ आले होते. सगळे खेळाडू जमिनीवर झोपले पण सचिन आपल्या टिपिकल स्टाइलमध्ये उभा होता, वादळ जायची वाट बघत…आठवतोय का? जर ती सचिनची मूर्ती आठवत असेल तर तुम्ही सचिनचे मोठे चाहते आहात असे मानायला हरकत नाही. मला ती सचिनची सर्वोत्तम खेळी वाटते. आणि त्या दौरयात सचिनने ऑस्ट्रेलियाच्या कानात खणखणीत आवाज काढला होता. त्याची दोन्ही शतके निव्वळ अप्रतिम होती. शेन वॉर्न आणि कंपनीला त्याने चांगलाच झोडून काढला होता.

सचिनचे नाव त्याच्या वडिलांनी प्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या नावावरून ठेवले असे म्हणतात. पण नाव ठेवताना सचिन असेच ठेवले. बहुतेक ‘देव’ ही पदवी सचिन क्रिकेट खेळून नक्की मिळवेल याची त्यांना खात्री असावी आणि सचिनने आपल्या वडिलांना निराश केलं  नाहीय. तो सचिन ‘देव’ तेंडूलकरच आहे. आणि त्याने ‘देव’ हे बिरूद कमावलंय! मध्यंतरी एक बोर्ड वाचला होता की, देवाला क्रिकेट खेळावेसे वाटले म्हणून त्याने सचिनला निर्माण केले. मी तर म्हणतो, सचिनला पाहून देवाला क्रिकेट खेळावेसे वाटतंय, पण आपण सचिनएवढे चांगले खेळू शकत नाही ही खात्री त्याला आहे, म्हणून तो सचिनचा आनंद लुटतोय!. 😉

सचिन नाही खेळला की आजकाल तेंडल्या खेळत नाही राव, अशी सहज प्रतिक्रिया उमटते. यात सचिन म्हणजे चांगला खेळणारच, तो परफेक्ट (देव) आहे मग तो खेळत कसा नाही ही भावना जास्त असते. मी म्हणतो, फक्त सचिनच खेळतो का भारतीय संघात? आणि बाकीच्यांना बरे कुणी एवढे बोलत नाहीत. त्याला जमेल तेवढा चांगला खेळतोच की….त्याच्याकडून आपण जास्त अपेक्षा करतो, यातच त्याच्यावर कठोर टीका का होते, याचे उत्तर आहे. बरं जर सचिनला देव म्हटले तर देवाचा सक्सेस रेट तरी १००% कुठे आहे? (देवाला केलेले नवस, मागितलेल्या गोष्टी आठवा आणि सक्सेस रेट काढा, प्रामाणिकपणे, नो चिटींग ;)) मागे अमिताभने म्हटले होते की सचिनने शतक केले की बँकेतला कॅशियरपण पैसे देताना खुश असतो. खरेतर त्याचा खेळ सगळ्यांना आनंदीत करतो, तो आनंद नाही मिळाला की मग निराशा होते. (सचिन संघात नसताना मुंबई इंडियनचा शेवटचा सामना कितीजणांनी बघितला? :) ) काहीजण तर त्याला घाल घाल शिव्या घालतात. फुकट जागा अडवून ठेवतो, तरुणांना संधी मिळाली पाहिजे वगैरे… पण सगळ्यांना तो फाट्यावर (क्षमा : बॅटने) मारतो. मला तर वाटते, एवढ्या लोकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन खेळणे हीच मोठी गोष्ट आहे. आजपण बहुतेक लोक सचिन बाद झाला की आता काही खरं नाही बोलतात. अगदी बरेच चांगले खेळाडू संघात असूनही! (मुंबई इंडियन ते भारतीय संघ, काही फरक नाही.)

काही दिवसांपूर्वी सचिन खेळत नव्हता तेव्हा चिक्कार लोकांनी त्याच्यावर तोंडसुख घेतले. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियनतर मजबूत आघाडीवर होते. खरेतर हा पस्तीशी उलटून गेला तरी खेळतोच कसा? हा राग त्यांना जास्त आहे. ह्याने सगळे रेकॉर्ड मोडले तर आपल्या पंटरला (रिकी पॉन्टिंग) रेकॉर्ड काही उरणारच नाही, मग पुढची पन्नास-शंभर वर्षेतरी सचिन’राग’ आळवत बसावे लागेल याची त्यांना बहुतेक भीती असावी. वरून त्यांना गावस्करतात्या सारखा डिवचत असतोच की सचिन हा क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज आहे, ब्रॅडमन नाही. (हा गावस्करतात्यापण इरसाल मनुष्य आहे. त्याला एकदा एका कार्यक्रमात जेफ्री बॉयकॉट बोलला की, शेन वॉर्नचा हा चेंडू म्हणजे शतकातला सर्वोत्तम चेंडू आहे. हा त्याला म्हणतो, त्यात काय एवढे, आमचा सुभाष गुप्ते ह्याच्यापेक्षा हातभर चेंडू वळवायचा आणि फलंदाजाची दांडी गुल करायचा. जेफ्रीला थोबाडीत मारून घेतल्यासारखे वाटले. ;))  इयान चॅपेलने सचिन, स्वतःला जरा आरशात बघ, असा लेख लिहिला होता. त्यात त्याने सडकून टीका केली (सचिनने २०० केल्यावर तो मनातल्या मनात शरमेने मेला असेल!)  त्याचे एकवेळ ठीक आहे, तो काही फार वाईट खेळाडू नव्हता (पुणेरी भाषेत! ;)) पण च्यामारी तो साबा करीम, सचिनने ऐसा खेलना चाहिये..असे बोलून मोकळा झाला. अरे कोण तू? कुठला तू? काहीपण? काही संबंध? किती सामने खेळलास तू? उचलली जीभ नी लावली टाळ्याला!  सगळे एकदम सचिनवर बरसले होते आणि हा पठ्ठ्या गुपचूप त्यांना आपल्या खेळीनेच उत्तर देत होता. त्याने कुणालाच भाव दिला नाही.

सचिनने २०० धावा केल्या (या खेळीनंतर गावसकरतात्याने  सचिनला कुर्निसात केला म्हणतात!) नी त्याला म्हातारा झाला बोलणारे परत ‘बिळात’ जाऊन लपले, पुढच्या संधीची वाट बघत! हा खेळ नेहमीचा आहे. सचिन दोन सामने खेळला नाही की हे सुरु, सचिन खेळला की गायब!  सचिनने २००चा रेकॉर्ड केला आणि सारा देश खुश झाला (खरेतर दुप्पट आनंद झाला, एकतर रेकॉर्ड तोडला आणि जो रेकॉर्ड होता, तो पाकिस्तानच्या सईद अन्वरचा रेकॉर्ड होता, तोही आपल्याविरुद्ध! ).

आज तो २०-२० च्या जमान्यात दाखवून देतोय, नुसती ताकद काढून फायदा नाही. तुमच्याकडे कसब असावे लागते. अगदी नगण्य षटकार मारूनही तो आयपीएलच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहे, ‘ऑरेंज’ कॅपचा मानकरी आहे. बाकी नुसते चेंडू दिसला की हाणतात (धोनीचा शॉट आठवा, काहीजण त्याला ‘धोबी’शॉट असेही म्हणतात!), हा बॉस जास्त जोर न लावता ज्या कौशल्याने (रामाची आई नव्हे! ;)) चेंडू तटावतो, हे दृश्य पाहत रहावेसे वाटते. चेन्नईत तर सामन्यावेळी फलक होता, ‘आम्ही सचिनचे स्वागत करतोय, मुंबई इंडियनचे नाही.’  जेव्हा या सामन्यावेळी सचिन थकून डगआउटमध्ये परतला तेव्हा गावस्करतात्या बोलला, बहुतेक आता लोकांना पटेल की सचिन माणूस आहे.

आजच्या संघात सचिनचे स्थान पितामहाचे आहे. सध्याच्या संघातले जवळजवळ सर्वचजण सचिनला आदर्श मानून क्रिकेट खेळायला लागले होते. काहीजणांचे वय तर त्याच्या क्रिकेटच्या अनुभवाएवढे आहे! सेहवागला संयम राखायचा सल्ला सचिनच देऊ शकतो आणि ‘बेडर’ सेहवाग सल्ला पाळतोदेखील! द्रविडने कर्णधारपद  सोडल्यावर कुंबळेला कर्णधार कधी बनवणार? त्याचा योग्य तो मान राखा, असे निगरगट्ट (यापेक्षा वाईट आणि ‘सभ्य’ शब्द सापडला नाही हो! 😉 ) BCCIला सचिनच ठणकावू शकतो. धोनीचे क्रिकेटकौशल्य माहित असल्याने त्याला एकदिवसीय संघाचा कप्तान बनवा, हा सल्लाही सचिनचाच! अशा सचिनला जो युवराज आजोबा म्हणतो, तोच युवराज आपल्या सचिनपाजीबद्दल बोलतो, पाजी, तू २०० धावा काढल्यावर मला मारुतीच्या (आठवा: सरदार पितापुत्रांची जाहिरात) जाहिरातीची आठवण आली. त्यातला लहान पोरगा आपल्या बापाला बोलतो, पापा, की करे, पेट्रोल खतमही नही होता! हरभजनसारख्या वांड कार्ट्यालापण तो आपल्या देहबोलीतूनच योग्य तो संदेश देतो. बाकी मुंबई इंडियनचा संघ सामना खेळताना त्यांचा ‘नेता’च काय तो सभ्य वाटतो (आणि जयसुर्या), बाकी सगळे ‘ वात्रट मेले’! गांगुलीसारखा खवचटपण बोलतो की संघात फक्त सचिनची जागा पक्की आहे! ते जाऊ दे, सायमंड्ससारखं उनाड पोरपण म्हणतं, सचिन, the man we all want to be!

अशा आमच्या सचिनला काही दिवसांपूर्वी एका समारंभामध्ये विचारले की, ‘सर्वोच्च ठिकाणी पोचूनही तुझे पाय जमिनीवर कसे?’ सचिन उत्तरला, “कारण क्रिकेट खेळण्यासाठी पाय जमिनीवर असावे लागतात.”

अशा सिम्पल पण लई बेश्ट ‘देव’माणसाला आपला सलाम!

अविनाश.

(हा ब्लॉग, मला सचिनविषयी लिहिण्यास उद्युक्त करणाऱ्या सचिन सुरवाडे आणि माझ्या नजरेतला बहुतेक सर्वात मोठा सचिनवेडा अद्वैत पळसुले, या दोघांना समर्पित! )

Comments
 1. Mrityunjay Narsule

  Ek number……………..saglya navin porana changle uttar ahe sir ……………

  ” Murti Lahan pan Kirti Mahan” ………..no words for Little Master………..He is legend ……….

 2. Kedar

  Mast article aahe…agadi mazya manatale lihile aahes…. :-)

 3. Kaustubh

  लई लई लई बेश्ट

 4. sachin surwade

  jhakaassssss….!!!!!!
  bhaari vatala he blog vachtanna sir…asa vatat hota sampaylach nako ha blog…
  ian chappel & saba karim ne he vachayla pahije…hahaa…!!!!!
  thnxx for dis blog sir…
  aani haa Sachin haa majha aani saglyaa cricket vedyancha DEV aahech…;)

 5. Ganesh Bhalerao

  Grea work sir..aksharshaha sachinchi karkird dolya pudhe ubhi rahate…..

 6. Vikrant Rayate...

  lai best ahe…………….Kharahch dev ahe dev….

 7. Atul Thakur

  Nice article, only die hard fan can write like this:)

 8. Raj Dinkar Mane

  Dear Avi

  Khupch chhan !
  vachun maja aali…. asech lih.

  Tuzyakadun prem ya vishaya varati blog chi apekha aahe.

  ????

  Raje

 9. vineet

  baaaap

 10. WAAAAAAAAAAAAAAA!!!!!!!!!!!!!
  APRATIM!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  TOD NAHI TUJHYA SHABDANA
  FAR CHAN LIHALE AAHE
  MALA TO SAMNA AJUN AATHAVTO JEVA ” GOD – SACHIN TENDULKAR ” EKTA TYA VADALAT KAMREVAR HATH THVUN MAIDANAT MAN VAR KARUN UBHA HOTA
  HATS OFF!!!!!!!!!!!!!

 11. need some comments on lalit modi / pawar crises

 12. चेतन सकपाळ

  खरच सचिन great आहे !!!
  मस्त लिहिले आहे तुम्ही…
  आणि चायला ह्या साबा करीम ला पैसेही मिलातात TV channels कडून हे सगलं बोलायला…

  सर, शिवाजी महाराजां वर एखादा blog possible???

 13. Priyanka

  अप्रतिम……..

ADD YOUR COMMENT